Dahihandi 2022: दहीहंडी शेवटच्या टप्प्यात असताना दोन गट भिडले; चाकू काढत थेट...
Aurangabad Dahihandi: कॅनॉट परिसरात शुल्लक कारणावरून दोन गटात वाद झाल्याची घटना समोर आली आहे.
Aurangabad Crime News: गेल्या काही वर्षानंतर पहिल्यांदाच सर्वत्र दहीहंडी सोहळा (Dahihandi 2022) मोठ्या जल्लोषात पार पडला. मात्र औरंगाबादमध्ये याच दहीहंडी सोहळ्याळा एका घटनेने गालबोट लागलं आहे. सोहळा शेवटच्या टप्प्यात असतांनाच शहरातील कॅनॉट परिसरात दोन गटात झालेल्या वादात चाकू हल्ल्याची घटना समोर आली आहे. ज्यात एक तरुण जखमी सुद्धा झाला आहे.
औरंगाबाद शहरात शुक्रवारी मोठ्याप्रमाणावर दहीहंडी सोहळे पाहायला मिळाले. बऱ्याच कालावधीनंतर मोठ्या जल्लोषात साजऱ्या होणाऱ्या दहीहंडीच्या या सोहळ्यात औरंगाबादकरांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. सर्वच ठिकाणी हा सोहळा शांतेत पार पडला असतांना, कॅनॉट परिसरात मात्र शुल्लक कारणावरून दोन गटात वाद झाल्याची घटना समोर आली आहे.
थेट चाकूच खुपसला...
शहरातील सर्व दहीहंडी सोहळा शेवटच्या टप्प्यात असतांना कॅनॉट परिसरात दोन गट अचानक भिडले. रात्री 10 वाजेच्या सुमारास धक्का लागल्याच्या शुल्लक कारणावरून या गटात आधी वाद झाला, त्यानंतर वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. दरम्यान एका तरुणाच्या मांडीत एकाने थेट चाकूच खुपसला. राडा होताच दोन्ही गटातील तरुणांनी तेथून पळ काढला. तर या चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणावर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर हल्लेखोरांचा पोलिसांकडून शोध सुरु असल्याची माहिती समोर आले आहे.
शहरात गोविंदांची लाट...
औरंगाबाद शहरातील पुंडलिकनगर, बजरंग चौक,गुलमंडी, कोकणवाडी चौक, औरंगपुरा, सिडको, कनॉट, निराला बाजारसह अनेक ठिकाणी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे शहरात गोविंदांची लाट पाहायला मिळाली. डीजेच्या तालावर तरुण-तरुणी बेधुंद होऊन नाचत असल्याचे दृश्य बहुतांश ठिकाणी पाहायला मिळाले. तर काही ठिकाणी सिनेअभिनेत्री-अभिनेत्यांनी हजेरी लावल्याने कृष्णभक्तांचा उत्साहात आणखीच भर पडली होती.
कोरोनाच्या लाटेनंतर पहिल्यांदाच जल्लोष...
गेली तीन वर्षे कोरोनाच्या लाटेमुळे सणासुदीच्या काळात घातलेल्या निर्बंधमुळे दहीहंडी सोहळा सुद्धा साजरा करता आला नव्हता. मात्र कोरोनानंतर यावर्षी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या जल्लोषात हा सण साजरा करता आला आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून वाट पाहत असलेल्या औरंगाबादकरांनी दहीहंडीचा मनसोक्त आनंद घेतला. यावेळी शहरातील चौका-चौकात तरुणांची गर्दी पाहायला मिळत होती. तर पोलिसांकडून सुद्धा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कॅनॉट परिसरातील घटना सोडली तर शहरात दहीहंडी सोहळे शांतेत पार पडल्याचे पाहायला मिळाले.
महत्वाच्या बातम्या...
मुंबईत 111, तर ठाण्यात 37 गोविंदा जखमी; काल दिवसभरात 88 गोविंदांवर उपचार करुन डिस्चार्ज