(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'मला बदनाम करण्यासाठी विरोधकांचं षडयंत्र', गुन्हा दाखल झाल्यानंतर धस यांची पहिली प्रतिक्रिया
Beed News: मी आधी असलेल्या पक्षातील स्थानिक नेते आणि वरिष्ठ नेत्यांनी मिळून मला बदनाम करण्यासाठी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले असल्याचं धस म्हणाले आहेत.
Suresh Dhas: देवस्थान जमिनी प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. विरोधकांनी माझ्या विरोधात रचलेलं हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप धस यांनी केला आहे. मी पूर्वी ज्या पक्षात होतो, त्या पक्षातील स्थानिक नेते आणि वरिष्ठ नेत्यांनी मिळून मला बदनाम करण्यासाठी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले असल्याचं धस म्हणाले आहेत.
देवस्थानच्या बेकायदा जमिनी बळकवल्याप्रकरणी भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश धस यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि भाऊ यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यावर प्रतिक्रिया देतांना सुरेश धस यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. 'मला बदनाम करण्यासाठी विरोधकांकडून षडयंत्र रचण्यात आलं असल्याचा' आरोप सुरेश धस यांनी केला आहे.
काय म्हणाले सुरेश धस...
यावेळी बोलतांना सुरेश धस म्हणाले की, 'माझ्यावर जे आरोप झाले आहेत आणि माझ्यासह कुटुंबीयांवर जे गुन्हे दाखल झाले आहेत, त्यासाठी मी पोलिसांना सहकार्य करायला तयार आहे. तर कुठलीही चौकशी झाली तरी मी त्या चौकशीला सामोरे जाणार असल्याचं सुरेश धस म्हणाले. एखाद्या राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठी अशा पद्धतीचं षडयंत्र रचले जात असेल, तर अनेक देवस्थाने आणि चॅरिटेबल ट्रस्टवर काम करणाऱ्या नेत्यांचं राजकीय आयुष्य संपुष्टात येईल अशी देखील शंका धस यांनी व्यक्त केली आहे.
काय आहे प्रकरण...
बीड जिल्ह्यात प्रशासनाला हाताशी धरून देवस्थान जमिनीचे घोटाळे झाले असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी केला होता. तर वक्फच्या प्रकरणात गुन्हे दाखल असून, हिंदू देवस्थानच्या प्रकरणात मात्र गुन्हे दाखल झाले नसून, गुन्हे दाखल करण्याची मागणी करत पोलीस आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे खाडे यांनी तक्रार केली होती. मात्र गुन्हे दाखल न झाल्याने खाडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात (Aurangabad Bench) धाव घेतली. त्या नंतर औरंगाबाद खंडपीठाने खाडे यांची तक्रारच एफआयआर म्हणून ग्राह्य धरत फौजदारी गुन्हे नोंद करा व नंतर तपास करा, असे आदेश दिले होते. याच आदेशाच्या विरोधात सुरेश धस यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने मुबंई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेश कायम ठेवल्याने सुरेश धस यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
Beed: देवस्थानच्या जमीन बळकवल्याप्रकरणी सुरेश धस यांच्यासह कुटुंबातील सदस्यांवर गुन्हे दाखल