(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Breaking News: औरंगाबाद जिल्ह्यात ठाकरे गटाच्या 'चक्काजाम' आंदोलनाला सुरवात; शिवसैनिक रस्त्यावर
Aurangabad : गंगापूर तालुक्यातील ईसरवाडी फाट्यावर दानवे यांच्या उपस्थितीत या आंदोलनाला सुरवात झाली असून, शिवसैनिकांकडून रस्त्यावर उतरत घोषणाबाजी करण्यात येत आहे.
Thackeray Group Protest: शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आज औरंगाबादमध्ये ठाकरे गटाकडून चक्काजाम आंदोलनाची घोषणा करण्यात आली असून, या आंदोलनाला सुरवात झाली आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले जात आहे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या आठ ठिकाणी हे आंदोलन करण्यात येत असून, गंगापूर तालुक्यातील ईसरवाडी फाट्यावर दानवे यांच्या उपस्थितीत या आंदोलनाला सुरवात झाली असून, शिवसैनिकांकडून रस्त्यावर उतरत घोषणाबाजी करण्यात येत आहे.
अतिवृष्टीमुळे शेतकरी आधीच संकटात सापडला असताना, महावितरणकडून थकीत वीज बिलापोटी शेतकऱ्यांचे कनेक्शन खंडीत केले जात आहे. सक्तीच्या वीजबिल वसुली विरोधात औरंगाबादमध्ये आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील इसारवाडी फाटा, वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला, कन्नड तालुक्यातील पिशोर नाका, पैठण येथील सह्याद्री चौक, सिल्लोड तालुक्यातील आंबेडकर चौक, फुलंब्री तालुक्यातील टी पॉइंट, भक्तनिवास समोर, रत्नपुर आणि करमाड येथे हे चक्काजाम आंदोलन केले जात आहे.
पोलिसांचा मोठा बंदोबस्त...
ठाकरे गटाकडून सुरु असलेल्या चक्का जाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद ग्रामीण पोलिसांकडून सर्वच आंदोलनास्थळी तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सर्वच चक्काजाम आंदोलन जिल्ह्यातील महत्वाच्या महामार्गावर करण्यात येत असल्याने वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.
सरकार विरोधात घोषणाबाजी...
ठाकरे गटाकडून करण्यात येत असलेल्या आंदोलनास्थळी शिंदे-फडणवीस सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. तर शेतकऱ्यांची वीज कनेक्शन खंडित करण्याची प्रकिया तत्काळ थांबवण्याची मागणी देखील यावेळी करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे.
दानवे-खैरेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात...
गंगापूर तालुक्यातील ईसारवाडी फाट्यावर आंदोलन करणाऱ्या विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना वाळूज पोलिसांनी ताब्यात घेतले. तर सोबतच त्यांच्यासह आणखी 50 ते 60 कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून सोडून देण्यात आले. तर दुसरीकडे वैजापूर येथील शिऊर बंगला येथे चक्काजाम आंदोलन करणाऱ्या चंद्रकांत खैरे यांना शिऊर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई करून त्यांच्यासह कार्यकर्त्यांना सोडून देण्यात आले. त्याचप्रमाणे पैठण,कन्नड,सिल्लोड,फुलंब्री येथे चक्काजाम आंदोलन करणाऱ्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई करत सोडून दिले.