Exclusive: भाजपच्या केंद्रीय मंत्र्याची मुलगी फडणवीस सरकारच्या विरोधात काढणार मोर्चा?
Aurangabad News : भाजपची सत्ता असताना भाजपच्याच केंद्रीय मंत्र्यांची मुलगी मोर्चा काढत असल्याने चर्चेला उधान आले आहे.
Aurangabad News : राज्यात सध्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना आणि भाजपची सत्ता आहे. मात्र काही दिवसांपूर्वी औरंगाबादच्या (Aurangabad) सिल्लोड येथील भाजप कार्यकर्त्यांनी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या ताब्यात असलेल्या नगरपरिषदेच्या विरोधात मोर्चा काढल्याने मोठी चर्चा झाली होती. दरम्यान आता भाजप केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या कन्या तथा माजी जिल्हा परिषद सदस्या संजनाताई जाधव यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (21 फेब्रुवारी) रोजी विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यामुळे राज्यात भाजपची सत्ता असताना भाजपच्याच केंद्रीय मंत्र्यांची मुलगी मोर्चा काढत असल्याने चर्चेला उधान आले आहे.
कन्नड-सोयगाव तालुक्यातील शेतकरी, महिला बचत गट, संजय गांधी स्वावलंबन आणि श्रावणबाळ योजनेतील प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संजना जाधव यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टी अनुदानाचे पैसे खात्यावर जमा करावे, शेतकऱ्यांचे वीजबिल सरसकट माफ करावे, उर्वरित गावांचा पोखरा योजनेत समावेश करावा, पी.एम. सन्मान निधीचा लाभ मिळावा, 2021-22 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे 15 कोल्हापुरी बंधारे वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले तरी त्यांची दुरुस्ती तत्काळ करण्यात यावी, अशा मागण्या यावेळी करण्यात येणार आहे.
कन्नड-सोयगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते दयनीय अवस्थेत आहे, त्यांची सुधारणा करावी, बचत गटांना कर्जपुरवठा करण्यात यावा, कापूस, ऊस, मका, सोयाबीन पिकांना योग्य भाव मिळावा या मागण्यांसाठी पिशोर नाक्यापासून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार असून, शेतकरी, बचत गटाच्या महिलांनी उपास्थितीत राहण्याचे आवाहन संजना जाधव समर्थकांकडून करण्यात आले आहे. संजनाताई जाधव यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच मोर्चा निघत असल्याने राजकीय पक्षांचे याकडे लक्ष लागले आहे.
राजकीय चर्चेला उधाण...
संजना जाधव यांच्याकडून कन्नड विधानसभा निवडणूक लढवली जाणार असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी पाहायला मिळाली होती. दरम्यान अशात संजना जाधव या कन्नड मतदारसंघात सक्रीय होताना पाहायला मिळत आहे. त्यातच त्यांनी आता विविध मागण्यासाठी मोर्चा काढणाच्या निर्णय घेतला असल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहेत. मात्र रावसाहेब दानवे यांच्या कन्या असलेल्या संजना जाधव यांचा मोर्चा भाजप सरकारच्याच विरोधातच असल्याने याची देखील चर्चा मतदारसंघात पाहायला मिळत आहे.
'या' आहेत प्रमुख मागण्या...
- शेतकऱ्यांचे अतीवृष्टी अनुदानाचे पैसे त्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे.
- शेतकऱ्यांचे विजबील सरसकट माफ करावे.
- कन्नड तालुक्यातील उर्वरीत गावांचा पोखरा योजनेत समावेश करण्यात यावा.
- पी. एम. किसान सन्मान निधीतील वंचीत शेतकऱ्यांचा समावेश करुन, त्यांना पी.एम. सन्मान निधीचा लाभ त्वरीत मिळावा.
- कन्नड तालुक्यात 2021-22 मध्ये झालेल्या आतीवृष्टीमुळे 15 कोल्हापुरी बंधारे वाहुन गेल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले तरी त्यांची दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी.
- कन्नड सोयगांव तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते हे अतीशय दयनीय अवस्थेत आहे. तरी त्यांची सुधारणा तात्काळ करण्यात यावी.
- महीला बचत गटांना व्यवसायाकरिता बिनव्याजी कर्जपुरवठा करण्यात यावा.
- कापुस, ऊस, मका, सोयाबिन या पिकांना योग्य भाव मिळालाच पाहिजेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
निवडणूक आयोगाच्या निकालानंतर चिन्ह, नाव शिंदेंकडे; आता शिवसेना भवनही ठाकरेंच्या हातून निसटणार?