औरंगाबादच्या देवगिरी नदीला पूर; पुरात अडकलेल्या दोघींना वाचवलं, एक जण मात्र वाहून गेली
Aurangabad: महिलांना वाचवण्यासाठी गेलेला एक पोलीस कर्मचारी सुद्धा पाण्याच्या प्रवाहात वाहून जात होता.
Aurangabad Flood: औरंगाबादमध्ये आज जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे तिसगाव परिसरात असलेल्या देवगिरी नाल्याला पूर आले आहे. दरम्यान कपडे धुण्यासाठी गेलेल्या 3 महिला अचानक आलेल्या पुरात अडकल्याचे समोर आले आहे. तर अचानक पूर आल्याने त्या आपला जीव वाचवण्यासाठी लाकडी ओंडक्यावर बसल्या होत्या. मात्र यातील एका जण वाहून गेली आहे. तर दोघांना वाचवण्यास यश आले आहे. तर महिलांना वाचवण्यासाठी गेलेला एक पोलीस कर्मचारी सुद्धा बुडाला होता, मात्र त्याला नागरिकांनी कसेबसे बाहेर काढत,रुग्णालयात दाखल केले आहे. नितु कालु जोगराणा (वय 17), हिरुबाई रघु जोगराणा (वय 50) यांना वाचवण्यात आले असून, राधा नागरी सावडा (वय 14) वाहून गेली आहे.
औरंगाबाद शहर आणि परिसरात अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे पाणीच पाणी झाले आहे. तर छोट्या-मोठ्या नदी नाल्यांना पूर आले आहे. अशातच देवगिरी नदीला आलेल्या पुरात कपडे धुण्यासाठी गेलेल्या तीन महिला अडकल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलीसांनी तात्काळ धाव घेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र एक जण वाहून गेली असून, दोघांना वाचवले आहे. वाहून गेलेली एक मुलगी असल्याचे बोलले जात आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाल बोलवण्यात आले असून, पाण्यात वाहून गेलेल्या मुलीचा शोध घेतला जात आहे.
पोलीस कर्मचारीही बुडाला, पण...
तीन महिला पाण्यात वाहून गेल्याची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस पोहचले होते. यावेळी किशोर गाडे नावाचे पोलीस कर्मचारी महिलांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरले होते. मात्र पाण्याचा वेग अधिक असल्याने तेही पाण्याच्या प्रवाहात वाहू लागले होते. उपस्थित नागरिकांनी आणि इतर पोलिसांनी त्यांना पाण्याचा बाहेर काढले आहे. तर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.