Aurangabad: जिथे सोळा लोकांना चिरडले तिथेच आता सुसाट चेन्नई एक्स्प्रेसने 43 मेंढ्यांना उडवले
Aurangabad : या भीषण अपघातात मेंढपाळांचे अंदाजे 4 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
Aurangabad News: औरंगाबादहून जालन्याकडे भरधाव जाणाऱ्या चेन्नई एक्स्प्रेससमोर अचानक मेंढ्या, एक गाय व दोन वासरे आल्याने चिरडली गेली आहे. या अपघातात एकूण 46 जनावरांचा चिरडून मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे 08 मे 2020 रोजी ज्या ठिकाणी मध्य प्रदेशातील सोळा कामगार चिरडले होते, त्या जागेपासून अवघ्या दोनशे फुटांवर ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी आणि स्थानिक पोलिसांनी धाव घेतली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील बानगाव टाकळी येथील सीताराम रामा गोवेकर (वय 66 वर्षे), कौतिक चिंतामण गोवेकर (वय 21 वर्षे) अंकुश चिंतामण गोवेकर (वय 25 वर्षे ) आणि समाधान काशीनाथ मोरे ही तीन कुटुंबे औरंगाबाद तालुक्यातील करमाड परिसरात तीनशे मेंढ्या घेऊन वास्तव्यास होते. सोमवारी दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास ते करमाड शिवारातून मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी रेल्वे पटरी ओलांडून सटाणा शिवारातील पाझर तलावावर गेले. पाणी पाजल्यानंतर मेंढ्या पुन्हा सटाणा शिवारात येत असतानाच भरधाव येणाऱ्या चेन्नई एक्स्प्रेसखाली मेंढ्यांसह इतर 46 जनावरे चिरडली गेली.
या भीषण अपघातात मेंढपाळांचे अंदाजे 4 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अपघात होताच भीतीपोटी मेंढपाळांनी ढग्या डोंगराच्या पायथ्याशी आसरा घेतला होता. स्थानिकांनी करमाड पोलिसांना घटनेची माहिती देताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मेंढपाळांना धीर दिला. तर पोलीस पथकाने घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.
विरोधी पक्षनेते दानवेंकडून ट्वीट...
या घटनेनंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. औरंगाबादच्या करमाड जवळ 43 मेंढ्या, एक गाय आणि दोन वासरांचा चिरडून मृत्यू झाला आहे. या 46 जनावरांना पाणवठ्यावरून परतताना चेन्नई एक्सप्रेसने चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली. शेतकऱ्यांनी आपली जनावरे सांभाळावीत आणि अश्याना काही मदत होते का? ते ही सरकारने पहावे, अशी मागणी दानवे यांनी केली आहे.
संभाजीनगरच्या करमाड जवळ ४३ मेंढ्या, एक गाय आणि दोन वासरांचा चिरडून मृत्यू झाला आहे. या ४६ जनावरांना पाणवठ्यावरून परतताना चेन्नई एक्सप्रेसने चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली. शेतकऱ्यांनी आपली जनावरे सांभाळावीत आणि अश्याना काही मदत होते का, ते ही सरकारने पहावे.
— Ambadas Danve (@iambadasdanve) October 4, 2022
महत्वाच्या बातम्या...
Aurangabad: गावातील चौकाला औरंगजेबाचे नाव दिल्याने वाद, पोलिसांकडून शांतता राखण्याचे आवाहन
Dasra Melava: एकट्या अब्दुल सत्तारांकडून 500 बसची बुकिंग, गर्दी जमवण्यासाठी दोन्ही गटात चढाओढ