Aurangabad: प्रशांत बंब यांना फोनवरून धमकी दिल्याचा आरोप, शिक्षकाच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल
Aurangabad News: अनेक शिक्षक प्रशांत बंब यांना फोन करून जाब विचारत आहे.
Aurangabad News: भाजप आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) यांनी शिक्षक मुख्यालयी राहत नसल्याचा मुद्दा विधानसभेत मांडल्यानंतर शिक्षकांनी त्यांच्याविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. तर अनेक शिक्षक त्यांना फोन करून जाब विचारत आहे. दरम्यान बंब यांना फोनवर जाब विचारून अर्वाच्च भाषा वापरत धमकी दिल्याप्रकरणी गंगापूर तालुक्यातील सिल्लेगाव पोलिसांत अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांनी मुख्यालयाच्या ठिकाणी उपस्थित राहण्याबाबत काही प्रश्न उपस्थित केले होते. सोबतच ग्रामसेवक, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचे मुख्यालयीच वास्तव्यास असणे आवश्यक आहे, असा मुद्दा सुद्धा मांडला होता. तर अनेक शासकीय कर्मचारी, अधिकारी व शिक्षक मुख्यालयी न राहता खोटे कागदपत्रे सादर करून घरभाडे उचलून शासनाची फसवणूक करतात, असेही ते म्हणाले होते. त्यावरून अनेक शिक्षक आमदार बंब यांना फोन करून जाब विचारत आहे. तर काही जण पातळी सोडून बोलत असल्याचा आरोप बंब समर्थकांनी केला आहे. विशेष म्हणजे या संभाषणाच्या ऑडिओ क्लिप समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे.
शिक्षकाच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल...
बंब यांना शिक्षक फोन करून जाब विचारत असतानाच, त्यापैकी एका शिक्षकाच्या पत्नीने आमदार बंब यांना फोन करून धमकी देऊन अर्वाच्च भाषा वापरून बदनामी केली असल्याचा आरोप बंब यांच्या समर्थकांनी केला. त्यामुळे लासूर गावच्या सरपंच मीना पांडव यांच्या फिर्यादीवरून गंगापूर तालुक्यातील-सिल्लेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे महिलेची ऑडिओ क्लिप सुद्धा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
बंब म्हणतात पोळखोल करून रहाणार...
ज्याप्रमाणे शिक्षक आणि प्रशांत बंब यांची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. तशाच काही प्रशांत बंब आणि त्यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या संभाषणाच्या क्लिप सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशाच एका ऑडिओ क्लिपमध्ये बोलताना बंब म्हणाले की, मला कितीही धमक्या आल्या तरीही मी घाबरणार नाही. जे बोगसगिरी करून घरभाडे उचलत असतील आशा शिक्षकांची मी पोलखोल करणार आहे. यासाठी गावागावातून पुरावे जमा करण्याचे काम सुरू असल्याचं बंब म्हणाले.