Jayakwadi Update: जायकवाडीतून 76 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग; 24 दिवसांत तीस टक्के पाण्याचा विसर्ग
Aurangabad: यावर्षी पहिल्यांदाचा धरणाचे दरवाजे 4 फुट उंचीने उघडण्यात आले आहे.
Jayakwadi News: मराठवाड्यातील सर्वात मोठं धरण असलेल्या जायकवाडीतून मोठ्याप्रमाणावर पाण्याचा विसर्ग केला जात आहे. वरील धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु केल्याने जायकवाडीतील आवक वाढली आहे. त्यामुळे आधीच 96 टक्के भरलेल्या धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. जायकवाडी धरणात सद्या 70 हजार 240 क्युसेक्सने आवक सुरु आहे, तर धरणातून 76 हजार 056 क्युसेक्सने विसर्ग करण्यात येत आहे. विशेष म्हणजे यावर्षी पहिल्यांदाचा धरणाचे दरवाजे 4 फुट उंचीने उघडण्यात आले आहे. त्यामुळे पैठण तालुक्यातील गोदावरी काठच्या 14 गावांना धोका वाढला आहे.
यावर्षी जुलै महिन्यातच नाशिक आणि जायकवाडी धरण परिसरात मोठा पाऊस झाल्याने धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली. तर अवघ्या 24 दिवसांत धरणातून तब्बल 30 टक्के पाण्याचा विसर्ग करण्याची वेळ आली. 25 जुलैरोजी पहिल्यांदा 18 दरवाजे उघडण्यात आले होते. त्यानंतर आतापर्यंत म्हणजेच गेल्या 24 दिवसांत धरणातून 31 टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे.
सद्याची परिस्थिती...
- पुर्ण संचय पातळी (FRL) : 1522.00 फुट
- सध्याची पाणी पातळी (WL) : 1521.21 फुट
- जिवंत पाणी साठा (Live) : 2076.6 दलघमी (73.33 टिएमसी)
- एकुण पाणी साठा (Gross) : 2814.706 दलघमी (99.39टिएमसी)
- पाण्याची आवक (Inflow): 70240 क्युसेक्स
- पाण्याचा विसर्ग (Discharge) : सांडव्याद्वारे 75456 क्युसेक्स, उजव्या कालव्यातून 600 क्युसेक्स
- एकुण विसर्ग: 76056 क्युसेक्स
नाशिकचे धरणे ओव्हरफ्लो
नाशिक जिल्ह्यातील धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यावरच जायकवाडी धरणाची पाणीसाठा वाढतो. दरम्यान नाशिक जिल्हयात जुलै महीन्यातचा धरणे भरत आली होती. तर सद्या अनेक धरणे ओव्हरफ्लो झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. ज्यात दारणा धरण समूहापैकी दारणा 96 टक्के भावली 100, मुकणे 98, वालदेवी 100, कडवा 89 भोजपूर 100 टक्के भरले आहे. गिरणा खोरे धरण समूहात चणकापूर 73 टक्के, हरणबारी 100 टक्के, केळझर 100 टक्के, गिरणा धरण 92 टक्के भरले आहेत. तर गिरणा धरणातून देखील दोन दिवसांपासून विसर्ग करण्यात येत आहे. तसेच पुनद प्रकल्प 76 टक्के, माणिकपुंज धरणात 71 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
दोन वर्षांचा पाणीप्रश्न मिटला...
ऑगस्ट महिन्यातच जायकवाडी धरणातून एवढा मोठा पाण्याचा विसर्ग करावा लागत असल्याने पाणीप्रश्न मिटला आहे. ज्यात औरंगाबाद,जालना, पश्चिम महाराष्ट्रातील सिंचन आणि पिण्याचा पाणी प्रश्न मिटला आहे. सोबतच गोदावरीवरील 14 बंधारे सुद्धा पूर्णपणे भरले असल्याने पाणी प्रश्न दोन वर्षांसाठी मिटला असल्याचे बोलले जात आहे.