Aurangabad: एकाच दिवशी दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार, संतापजनक घटनेनं औरंगाबाद हादरलं
Aurangabad Crime News: पोलिसांनी या दोन्ही घटनेतील आरोपींना बेड्या ठोकल्या आहे.
Aurangabad Crime News: एकाच दिवशी शहरात दोन बलात्काराच्या घटनेने औरंगाबाद शहर हादरलं आहे. वाळूज महानगरात एकाच दिवशी दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. एका 10 वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला शाळेतून ढाब्यावर नेत तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. तर दुसऱ्या घटनेत 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात एकटीच असल्याची संधी साधत तिला घरातून ओढत शेतात नेऊन बलात्कार करण्यात आला आहे. पोलिसांनी या दोन्ही घटनेतील आरोपींना बेड्या ठोकल्या आहे. शिवा चौधरी आणि रमेश येडूबा मोरे असे दोन्ही आरोपींचे नावं आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळूज भागातील 10 वीच्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलीसोबत आरोपीने मैत्रीचा बहाणा करून तिला आपल्या जाळ्यात ओढले. त्यानंतर या विद्यार्थिनीला तिच्या शाळेच्या गेटपासून आपल्या दुचाकीवर बसवून खुलताबाद येथील एका ढाब्यावर घेऊन गेला. तिथे गेल्यावर तिच्यावर बळजबरीने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तर आरोपीने यापूर्वी देखील या अल्पवयीन मुलीला तीन ते चार वेळा ढाब्यावर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी शिवा चौधरी याला पोलिसांनी अटक केली आहे.
दुसऱ्या एका घटनेत 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे. यातील आरोपीने घराच्या पाठीमागून येऊन पीडित मुलीला पिण्याचे पाणी मागितले. पणी घेऊन आलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला आरोपीने बळजबरीने कपाशीच्या शेतात ओढत नेलं. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. तर घडलेला प्रकार कुणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र मुलीने हिम्मत करत घडलेला प्रकार कुटुंबातील सदस्यांना सांगितला आणि त्यानंतर रमेश येडूबा मोरे या नराधमाविरोधात वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बलात्काराच्या घटनेनं शहर हादरलं...
औरंगाबाद शहरातील मागील काही दिवसांच्या घटना पाहता, शहरात महिला सुरक्षेचा मुद्दा कायम समोर येत आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी शाळेतील अल्पवयीन मुलींसोबत रिक्षाचालकाने अश्लील चाळे करण्याचा प्रकार समोर आल्याने पालकांमध्ये खळबळ उडाली होती. त्यातच आता वाळूज भागात एकाच दिवशी दोन अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या घटना समोर आल्याने शहर हादरलं आहे. त्यामुळे आता शहरातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा एरणीवर आला आहे.