Crime: क्रिप्टो ट्रेडिंगच्या गुंतवणुकीतून अर्ध्या तासात पैसे डब्बल करण्याचं आमिष; झटक्यात 71 हजारांचा चुना
Aurangabad Crime: औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या आरोपीला सुरतमधून अटक केली आहे.
Aurangabad Crime News: आधुनिक डिजीटल युगात वावरतांना किंवा समाजमाध्यमांचा वापर करतांना सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. दरम्यान अशीच काही घटना औरंगाबादच्या कन्नड तालुक्यात घडली आहे. इन्स्टाग्रामवरून क्रिप्टो ट्रेडिंग करून अर्ध्या तासात पैसे डब्बल करून देतो अशा थाप मारून एका तरुणाला अज्ञात व्यक्तीने तब्बल 71 हजारांचा चुना लावला. दरम्यान अखेर औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या आरोपीला सुरतमधून अटक केली आहे. सय्यद महंमद उनेस मियाँ हाफीज (वय 30 वर्ष, रा. 101, अलकुरेशी अपार्टमेंट, नानपुरा मार्केट, सुरत राज्य गुजरात) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,कन्नड येथील तक्रारदार यांनी पोस्टे सायबर येथे संपर्क करून माहिती दिली की, त्यांचे मुलास अज्ञात इन्स्टाग्राम खात्याचा वापरकर्ता याने क्रिप्टो ट्रेडिंग करून अर्ध्या तासात पैसे डब्बल करून देतो अशा थाप मारून 71080 रूपयांचा भरणा करून घेवून फसवणूक केली आहे. यावरून सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान सायबर पोलिसांच्या पथकाने नमूद गुन्हयाचे तांत्रिक तपासात गुन्हयात वापरलेले इन्स्टाग्राम खात्यांची माहिती हस्तगत केली. त्यावरून गुन्हयातील आरोपी गुजरातमधील सुरत येथील असल्याचे निष्पन्न केले. त्यामुळे औरंगाबाद ग्रामीण पोलिसांच्या पथकाने मोठया शिताफीने आरोपी सय्यद महंमद उनेस मियाँ हाफीज याला सुरतमधून ताब्यात घेतले. यावेळी त्याने आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर आरोपीला औरंगाबाद येथे आणण्यात आले.
बऱ्याच लोकांची फसवणूक
पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने पैसे कमविण्यासाठी गुन्हा केल्याचं समोर आलं आहे. यासाठी त्याने क्रिप्टो ट्रेडिंगचे नावाने इन्स्टाग्राम खाते तयार केले. तसेच नमूद खात्यावर जे-जे लोक गुंतवणूकीसाठी त्यांना मेसेज करत ते त्यांना अर्ध्या तासात तुमचे पैसे डब्बल करून देतो असे सांगून पैशांचा भरणा करून घेत. याप्रकारे त्याने बऱ्याच लोकांची फसवणूक केली असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे त्याने आणखी कोणकोणाची अशा प्रकारे फसवणूक केली आहे याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. तर आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांचे आवाहन...
या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियाचा वापर करतांना काळजी घेण्याचा आवाहन केलं आहे. कुठलीही गुंतवणूक करण्यापुर्वी अगोदर खात्री करा. असे प्रकार आढळून आल्यास तात्काळ सायबर पोलीस ठाणे औरंगाबाद ग्रामीण येथे संपर्क साधावा असे आवाहन पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी केले आहे.