Aurangabad: पत्नीला माहेरी जाण्यास नकार देणाऱ्या वडिलांवर मुलाकडून चाकू हल्ला
Aurangabad Crime News: वडिलांना रुग्णालयात दाखल करून फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.
Aurangabad Crime News: शहरातील अल्तमश कॉलनीत एक धक्कादायक घटना समोर आली असून, शुल्लक कारणावरुन मुलाकडून जन्मदात्या बापावर चाकू हल्ला करण्यात आला आहे. पत्नीला माहेरी जाण्यासाठी वडिलांनी नकार दिल्याने आधी वाद झाला, त्यांनतर मुलाने घरातील गुप्तीने वडिलांवर हल्ला केला. ज्यात वडील गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहे. तर मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. आमीर इरफान शेख (22, रा. रहीमनगर, अल्तमश कॉलनी) असे आरोपी मुलाचे नाव आहे.
नेमकं काय घडलं...
काही महिन्यांपूर्वीच आमीरचा विवाह झाला आहे. दरम्यान रविवारी घरी असताना त्याच्या पत्नीचा भाऊ, त्याची बायको घरी आले होते. यावेळी त्याचे वडील सुद्धा घरातच होते. दरम्यान अमीरच्या पत्नीने भावासोबत माहेरी जाण्याची इच्छा व्यक्त केली. अमीरकडून सुद्धा होकार मिळाला. पण याचवेळी अमीरच्या वडिलांनी सुनेला माहेरी जाण्यासा नकार दिला. त्यामुळे बाप-लेकात सुरवातीला वाद झाला. त्यांनतर वाद एवढ्या विकोपाला गेला की, अमीरने घरातील गुप्ती सदृश हत्याराने वडिलांच्या डोक्यात वार केले. त्यानंतर पोटात मागील बाजूने हल्ला केला. ज्यात इरफान गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
पोलिसांनी ठोकल्या बेड्या...
पतीने सासऱ्यावर चाकू हल्ला करताच आमिरच्या पत्नीने आरडाओरडा केला. तिचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेत इरफान यांना रुगणालयात दाखल केले. वडीलांना रुग्णालयात दाखल करून अमीर पुन्हा घरी आला. त्यांनतर घरातील रक्त पुसून घेतले. हल्ला करताना वापरलेली गुप्ती सुद्धा पाण्याने धुवून घेतली. त्यांनतर धुतलेली गुप्ती घरातील कपाटीखाली लपवून फरार झाला. जिन्सी पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत अमीर फरार झाला होता. त्यामुळे पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवली आणि त्याला नारेगाव भागातून अटक केली.
तलाठ्याचा मृतदेह सापडला...
चार महिन्यांपूर्वी सेवा बजावून निवृत्त झालेल्या एका तलाठ्याने शहरातील सिद्धार्थ उद्यानात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. बशीर अहमद शेख (58) असे मृतदेह सापडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. शहरात राहणाऱ्या बहिणीला भेटून परत गावाकडे जाण्यासाठी निघाले असताना त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आधी अंगावर कटरने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. नंतर गळफास घेतल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र हत्या की आत्महत्या दोन्ही दृष्टीने पोलीस तपास करत आहेत.