Aurangabad: डोक्यावर हात ठेवल्याने एड्स बरा, भोंदूबाबाच्या गावात पोहचलं प्रशासन; 'एबीपी माझा'ने दाखवली होती बातमी
Aurangabad Bhondubaba: पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल नेहूल यांनी गावात जाऊन पाहणी करत आढावा घेतला आहे.
Aurangabad News: औरंगाबाद जिल्ह्यातील पारुंडी गावातील भोंदूगिरी करणाऱ्या एका बाबाची एबीपी माझाने पोलखोल करताच प्रशासन खडबडून जागं झालं आहे. तर महसूल आणि पोलीस प्रशासनाने गावात जाऊन प्रत्यक्षात पाहणी केली आहे. त्यामुळे या भोंदूबाबाच्या हातात लवकरच बेड्या पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे गेली दीड-दोन वर्षांपासून या बाबाचा अंधश्रद्धेचा बाजार सुरु होता.
औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील पारुंडी गावात बाबासाहेब शिंदे नावाच्या एका भोंदूबाबा गेली अनेक वर्षे आरोग्य सभा भरवत होता. ज्यात एड्स,कॅन्सर, शुगर असे आजार आपण फक्त डोक्यावर हात ठेवल्याने बरे होत असल्याचा दावा हा शिंदे बाबा करायचा. त्याच्या याच दाव्यांना बळी पडून हजारो लोकं त्याच्याकडे उपचारासाठी येत होते. विशेष म्हणजे यातील जवळपास सर्वच लोकं ग्रामीण भागातील असायची.
भोंदूबाबाच्या गावात पोहचलं प्रशासन...
याप्रकरणी आता प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गावात जाऊन या सर्वांची पाहणी केली आहे. पाचोड पोलीस आणि पैठण पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी पारुंडी गावात जाऊन ज्याठिकाणी हा दरबार भरत होता त्याठिकाणीची पाहणी केली. तसेच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा गावात जाऊन पंचनामा केला आहे. त्यामुळे आता या बाबावर कधीही कारवाई होण्याची शक्यता आहे. तसेच त्याला नोटीस देऊन चौकशीसाठी पोलिसांकडून बोलवण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा पोलीस सूत्रांनी दिली आहे.
'एबीपी माझा'कडून भांडाफोड...
पारुंडी गावात बाबासाहेब शिंदेचा दरबार भरत असल्याची माहिती मिळताच एबीपी माझ्याच्या टीमने गावात जाऊन रियालिटी चेक केली असता धक्कादायक प्रकार समोर आला. जे उपचार डॉक्टर करू शकत नाही असे आजार आपण बरे करतो असा दावा शिंदे याने केला. एवढंच नाही तर आपण फक्त डोक्यावर हात ठेवल्याने सर्वच आजार बरे होण्याचा दावा हा बाबा करायचा. त्याचा हा सर्व अंधश्रद्धेचा बाजार एबीपी माझाच्या टीमने कॅमेरत कैद केला होता. त्यानंतर एबीपी माझाने बातमी दाखवताच आता प्रशासकीय यंत्रणा सुद्धा कामाला लागली असून, या बाबाविरोधात कारवाई होण्याची शक्यता आहे. सोबतच अनेक राजकीय नेते आणि मंत्र्यांनी सुद्धा या बाबावर कारवाईची मागणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या...
औरंगाबादमधील भोंदूबाबाचा भांडाफोड, डोक्यावर हात ठेऊन आजार बरे करण्याचा दावा
Aurangabad: 'माझा'ने भोंदूबाबाची बातमी दाखवताच राजकीय मंडळीही आक्रमक; मंत्र्यांकडून चौकशीचे आदेश