Crime: 'मला आय लव्ह यू म्हण, नाहीतर गल्लीत फोटोचे बॅनर लावीन'; पोलिसात मजनूविरोधात गुन्हा दाखल
Aurangabad Crime News: याप्रकरणी क्रांती चौक पोलिसात गुन्हा दाखल.
Aurangabad Crime News: विवाहितेला एकतर्फी प्रेमातून त्रास देणाऱ्या एका मजनू विरोधात पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने आधी विवाहितेशी ओळख करून मोबाईल नंबर मिळवला . त्यानंतर मला आय लव्ह यू म्हण, अन्यथा तुझ्या फोटोचे गल्लीत बॅनर लावीन, अशी धमकी दिली. त्यामुळे अखेर विवाहितेने पोलिसात धाव घेत या मजनू विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सचिन दाभाडे, असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,'तुझ्या नवऱ्याविषयी तुला काही सांगायचे आहे', असे म्हणत आरोपी सचिनने पीडितेला आधी विश्वासात घेतले. त्यानंतर पुढे तिचा व्हॉट्सअॅप क्रमांक, इन्स्टाग्राम आयडी व पासवर्ड मिळवला. दरम्यानच्या काळात दोघांमध्ये ओळख झाली. मात्र त्यानंतर सचिन पीडितेला वारंवार संपर्क साधून 'आय लव्ह यू म्हणाली नाहीस तर तुझे फोटो गल्लीतील मुलांच्या ग्रुपवर व्हायरल करेन', अशी धमकी दिली. सोबतच तुझ्या फोटोचे गल्लीत बॅनर लावीन अशीही धमकी दिली.
पोलिसात गुन्हा दाखल
सचिन याच्याकडून सतत येणाऱ्या मॅसेजमुळे महिला कंटाळली होती. त्यामुळे तिने सचिनचा नंबर ब्लॉक केला. मात्र त्यानंतर सुद्धा त्याने दुसऱ्या क्रमांकावरून संपर्क साधत धमकी देत शिवीगाळ केली. या त्रासाला कंटाळून पीडितेने क्रांती चौक ठाण्यात धाव घेऊन दाभाडेविरुद्ध तक्रार दिली. त्यानुसार त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनयभंग करणाऱ्या आरोपीला 6 महिन्याची सक्तमजुरीची शिक्षा
अशाच एका घटनेत विनयभंग करणाऱ्या एका आरोपीला न्यायालयाने 6 महिन्याची सक्तमजुरीसह 5 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. नितीन इंद्रसेन परदेशी( वय 37 वर्षे, भवानीनगर) असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी महिला आणि आरोपी नातेवाईक आहेत. दरम्यान महिला घरात स्वयंपाक करत असतांना आरोपी बळजबरीने घरात आला आणि दरवाजा लावला. त्यानंतर तो हातात चाकू घेऊन महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र महिलेने कसाबसा आपला जीव वाचवला होता. याप्रकरणी जिन्सी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने यावर अंतिम सुनावणी करतांना आरोपी नितीनला 6 महिन्याची सक्तमजुरीसह 5 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
महत्वाच्या बातम्या....
धक्कादायक! विरोधात निकाल देताच महिलेला आला तहसील कार्यालयातच हृदय विकाराचा झटका
Aurangabad: कंपन्या येण्यापूर्वीच 'ऑरिक सिटी' चोरट्यांच्या निशाण्यावर; पोलिसांची कारवाई