Aurangabad : 'समृद्धी'वर सिनेस्टाइल गोळीबार करून 'फुकटची हवा'; अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Aurangabad Crime News: समृध्दी महामार्गावरील बोगद्याजवळ बंदुकीतून हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
Aurangabad Crime News: औरंगाबादच्या (Aurangabad) हर्सूल सावंगी जवळ असलेल्या समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) हवेत गोळीबार केल्याचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर टाकल्याच्या प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला आहे. सोशल मीडियावर हवा करण्यासाठी हवेत गोळीबाराचा हा एडिटेड व्हिडीओ बनविला असल्याच पोलिसांच्या तपासात समोर आले. तर याप्रकरणी आरोपी चंद्रकांत ऊर्फ बाळू कैलास गायकवाड (वय 30 वर्षे, रा. बेगमपुरा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
14 डिसेंबर रोजी हर्सूल सावंगी येथील समृध्दी महामार्गावरिल बोगद्याजवळ एका तरुणाने त्याच्या चारचाकी वाहनाचे समोर येते त्याच्या जवळील अनाधिकृतपणे बेकायदेशिर बाळगत असलेल्या अग्नीशस्त्रातुन हवेत फायरिंग करून दहशत पसरवत असल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केला होता. त्यामुळे याप्रकरणी व्हिडिओत दिसणाऱ्या तरुणाच्या विरुध्द पोलीस ठाणे फुलंब्री येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी घेतलं आरोपीला ताब्यात...
घटनेची गांर्भीयाने दखल घेवुन औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी व्हिडीओतील व्यक्ती व त्याने वापरलेले शस्त्र यांचा शोध घेण्याची सुचना फुलंब्री पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. दरम्यान पोलीसांचे दोन्ही पथक व्हिडीओतील व्यक्तीचा शोध घेत असतांना त्यांना आरोपीची गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेत विचारपुस करता त्याचे नाव विचारले असता त्याने चंद्रकांत कैलास गायकवाड उर्फ बाळु गायकवाड (वय 30 वर्षे रा. बेगमपुरा, औरंगाबाद) असल्याचे सांगितले. तसेच व्हायरल झालेला व्हिडिओ आपलाच असल्याची कबुली देखील दिली.
व्हिडिओतील बंदुक प्लास्टिकची
पुढे पोलिसांनी सोशल मिडयावर प्रसारित केलेल्या त्याच्या व्हिडीओतील अग्नीशस्त्रा बाबत सखोल चौकशी असता, व्हिडीओ बनविण्याकरिता मुलांच्या खेळण्यातील प्लास्टिकची खेळणीतील बंदुक वापरल्याचे त्याने सांगितले. तर व्हिडीओ एडिटिंग करणाऱ्या एका मित्राच्या साहय्याने त्या व्हिडीओतील अग्नीशस्त्राला स्पेशल इफेक्ट व साऊंड देवुन बनविला असल्याचे त्याने कबुल केले.
अन्यथा कारवाईचा पोलिसांचा इशारा...
सोशल मिडियावर स्टंटबाजी करून, धोकादायक शस्त्रांसह फोटो काढुन, समाजात दहशत पसरविणाऱ्या विरुध्द कठोर कारवाई करण्यात येणार आहे. युवकांनी अशा प्रकारची स्टंटबाजी करू नये. प्राणघातक शस्त्रांसह सार्वजनिक ठिकाणी दहशत पसरवणारी कृत्ये करून त्याचे व्हिडीओ, फोटो,सोशल मिडियावर व्हायरल करु नये. अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या व्यक्तीवर सायबर सेल व स्थानिक गुन्हे शाखा यांची विशेष नजर असून, अशा व्यक्तींला सक्त व कठोर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा पोलीस अधीक्षक यांनी दिला आहे.
Video: 'रॉकी भाईची हवा...' थेट समृद्धी महामार्गावर केली फायरिंग, व्हिडिओ व्हायरल