संतापजनक! दुकानात बिस्किट घेण्यासाठी आलेल्या पाच वर्षीय मुलीवर बलात्कार, गुन्हा दाखल
Aurangabad Crime News: पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Aurangabad Crime News: औरंगाबाद जिल्ह्यात एक संतापजनक घटना समोर आली असून, किराणा दुकान चालकाने पाच वर्षीय मुलीवर बलात्कार केला आहे. औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील पाचोड पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात ही घटना घडली आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बळीराम सीताराम चव्हाण असे या नराधम आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात बळीराम याचे किराणा दुकान आहे. दरम्यान पिडीत मुलगी बिस्किट आणि पाव आणण्यासाठी गेली होती. यावेळी आरोपी बळीराम याने मुलीला मी तुला खाण्यासाठी चॉकलेट देतो असा म्हणाला. तर चॉकलेटचे आमिष दाखवून तुझे सामान घेण्यासाठी आतमध्ये ये म्हणत मुलीला दुकानात बोलावून घेतले. त्यानंतर मुलीवर अत्याचार केला. या घटनेने घाबरून मुलगी आपल्या घरी गेली.
मुलीच्या आईला धमकी...
पिडीत मुलीवर अत्याचार केल्यावर घाबरलेल्या त्या मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला. मात्र हा प्रकार कुणालाही सांगितल्यास किंवा पोलिसात गेल्यास तुम्हाला जगू देणार नाही अशी जीवे मारण्याची धमकी आरोपीने पिडीताच्या आईला दिली होती. त्यामुळे घाबरलेल्या मुलीच्या आईने याबाबत कुठेही वाच्यता केली नाही. मात्र अखेर हिम्मत करत त्यांनी आज पाचोड पोलीस ठाणे गाठत नराधमाविरोधात फिर्याद दिली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल...
दुकानात आलेल्या पाच वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या बळीराम चव्हाण या नराधमाच्या विरोधात पिडीत मुलीच्या आईच्या फिर्यादीनुसार पाचोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी कलम 376 (2) (1) (F), 376 (3), 376 (अ) (ब), 506 भा.द.वि. सहकलम4,6 बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. तर नराधमाला पोलिसांनी अटक केली असून, त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.