(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad Crime : वाळू माफियांकडून पोलिसाच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न; दोघांवर गुन्हा दाखल
Aurangabad: या घटनेत संबंधित पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाला असून, त्याच्या उजव्या पायावरून ट्रॅक्टरचे चाक गेल्याने पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
Aurangabad Crime News : औरंगाबादच्या (Aurangabad) कन्नड तालुक्यात एका धक्कादायक प्रकार समोर आला असून, वाळू माफियांकडून (Sand Mafia) कारवाईसाठी गेलेल्या पोलिसाच्या अंगावर थेट ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथील पूर्णा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी (17 जानेवारी) रात्री घडली आहे. या घटनेत संबंधित पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला असून, त्याच्या उजव्या पायावरुन ट्रॅक्टरचे चाक गेल्याने पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबादच्या ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून अवैधरित्या वाळू वाहतुकीत मोठ्याप्रमाणावर वाढ झाली आहे. दरम्यान चिंचोली लिंबाजी येथील पूर्णा नदीपात्रातून देखील मोठ्याप्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा करण्यात येत आहे. तर मंगळवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास वाळू भरुन एक ट्रॅक्टर जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागून चिंचोली लिंबाजी करंजखेड रस्त्याला लागून असलेल्या नवीन बस स्थानकाकडे येत होता. यावेळी रात्रीच्या गस्तीवर असलेले पिशोर पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल वसंत पाटील, एस. आर. भिवसने, अन्सार पटेल, वाहन चालक सुनील जाधव यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी ट्रॅक्टरचा पाठलाग करुन ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रॅक्टर चालकाने समोरुन आलेले पोलीस कॉन्स्टेबल सुनील जाधव यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
पोलीस कर्मचाऱ्याचा पाय फ्रॅक्चर झाला
पिशोर पोलीस ठाण्याचे पथक रात्रीच्या गस्तीवर असतांना रस्त्याने जाणाऱ्या एका वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरला त्यांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र यावेळी चालकाने ट्रॅक्टर न थांबवता थेट पोलीस कॉन्स्टेबल सुनील जाधव यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी जाधव यांच्या पायावरुन चाक गेल्याने त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. यावेळी चालक ट्रॅक्टर घटनास्थळी सोडून पसार झाला. बुधवारी (18 जानेवारी) ट्रॅक्टर मालक बाळू तेजराव पवार, चालक सुनील दादाराव जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वाळू माफियांचा हिंमत वाढली!
औरंगाबाद ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी अवैध वाळू उपसा आणि वाहतूक होताना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे महसूल प्रशासनाकडून जाणीवपूर्वक कानाडोळा केला जात असल्याने अशाप्रकारे अवैध वाळू वाहतूक वाढली असल्याचा आरोप होत आहे. तर पोलिसांकडून देखील हवी तशी कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे वाळू माफियांची हिंमत एवढी वाढली की, थेट पोलिसांच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: