काय सांगता! बाहेरून दिसणाऱ्या कपाशीच्या पिकात चक्क गांजाची झाडे, पोलिसांनाही कारवाईसाठी लागले तीन तास
Aurangabad: पोलिसांनी घटनास्थळी तब्बल तीन तास कारवाई करून 63 किलो 950 ग्रॅम गांजाची झाडे हस्तगत करून 3 लाख वीस हजार 950 रुपये मुद्देमाल शेतातून हस्तगत केला.
Aurangabad Crime News: सद्या खरीपाचा हंगाम सुरु असून, औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी कपाशीच्या पिकाची लागवड केली आहे. दरम्यान सोयगाव तालुक्यातील एकाने दोन एकर क्षेत्रातील कपाशी व तूर पिकांमध्ये चक्क गांजाची लागवड केल्याची घटना समोर आली आहे. सोयगावच्या जरंडी शिवारात सोयगाव पोलिसांच्या कारवाईत हा प्रकार उघड झाला आहे. विशेष म्हणजे सोयगाव पोलिसांनी घटनास्थळी तब्बल तीन तास कारवाई करून 63 किलो 950 ग्रॅम गांजाची झाडे हस्तगत करून 3 लाख वीस हजार 950 रुपये मुद्देमाल शेतातून हस्तगत केला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोयगाव-बनोटी रस्त्यालगत जरंडी शिवारात एकाने कपाशी व तूर लागवड केलेल्या दोन एकर क्षेत्रात गांजाची लागवड केली असल्याची माहिती सोयगाव पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिस निरीक्षक अनमोल केदार यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन जरंडी शिवारातील गट क्र. 29 मधून 63 किलो 950 ग्राम वजनाची गांजाची झाडे हस्तगत केली. संशयीत सुभाष महादू महाजन (रा.जरंडी, ता. सोयगाव) याच्याविरुद्ध सोयगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली. विशेष म्हणजे सोयगाव पोलिसांची चार वाजेपासून सुरू असलेली कारवाई तब्बल तीन तासांनी आटोपली. तर या प्रकरणी शेतात झाडात लपून बसलेल्या संशयीताला सोयगाव पोलिसांनी अटक केली आहे.
यांनी केली कारवाई...
ही कारवाई सोयगाव पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनमोल केदार, उपनिरीक्षक सतीश पंडित, जमादार राजू मोसम बर्डे, गणेश रोकडे, ज्ञानेश्वर सरताळे, रवींद्र तायडे, अजय कोळी यांनी केली आहे. या कारवाईसाठी या पथकाला तब्बल साडेतीन तास लागले. यासाठी संपूर्ण दोन एकर क्षेत्रातील कपाशी व तूर पिकांमध्ये पोलिसांनी पाहणी केली.
तब्बल नऊ फुटांचे झाडे...
सोयगावच्या जरंडी शिवारातील गट क्र. 29 मध्ये छाप्यात सोयगाव पोलिसांनी केलेल्या कारवाईत नऊ फूट उंच वाढलेली गांजाची झाडे आढळून आली. या झाडांना पिवळसर बोंडे लागून आलेली होते, त्यामुळे ही गांजाची झाडे परिपक्क झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान घटनास्थळी महसूल आणि कृषीच्या अधिकाऱ्यांसह सोयगाव पोलिसांनी पंचनामा केला आहे. तसेच येथे याच्या पेंढ्या देखील आढळल्या. मोजदाद करण्यासाठी पोलिसांना तासभराचा कालावधी लागला. तर याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे.
महत्वाच्या बातम्या...
Aurangabad: बसच्या खिडकीतून डोकावून पाहणं शाळकरी मुलाला पडले महागात, गमावला जीव