Aurangabad: चोरलेल्या 36 मोटारसायकली चक्क शेतात लपवून ठेवल्या, पोलिसांनी असा लावला शोध
Aurangabad Crime News: औरंगाबाद शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून शेतात लपवून ठेवलेल्या एकूण 36 मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.
Aurangabad Crime News: गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहरात मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये मोठ्याप्रमाणावर वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच मॉलच्या पार्किंगमध्ये लावण्यात आलेल्या दुचाकी चोरीच्या घटना देखील वाढल्या होत्या. दरम्यान औरंगाबाद शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कामगीरी करत अखेर, मोटारसायकल चोरणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या आहे. तर त्यांच्या ताब्यातून शेतात लपवून ठेवलेल्या 21 लाख 95 हजार किंमतीच्या एकूण 36 मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. शैलेष गोरख खेडकर (वय 20 वर्षे, रा. शिवनेरी कॉलनी, रांजनगाव शे.पु. ता. गंगापुर) आणि विजय अळींग असे या दोन्ही आरोपींचे नावं आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद शहरातील मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी गुन्हे शाखेच्यावतीने विशेष पथक नेमण्यात आले होते. गेल्या तीन महिन्यापासुन अहोरात्र परिश्रम घेऊन हे पथक मोटरसायकल चोरीतील घटनास्थळांचा अभ्यास, चोरीचा वेळ, सिसिटीव्ही कॅमेरे, गुप्त बातमीदार नेमले इत्यादींचा समन्वय साधुन चोरट्यांचा शोध घेत होते. याचवेळी शैलेष खेडकर याने शहरातुन विविध ठिकाणाहुन चोरलेल्या मोटरसायकली विक्री करण्याच्या उद्देशाने कन्नड तालुक्यातील आंबा गावातील आपल्या शेतात लपवून ठेवल्या असल्याची माहिती गोपनीय माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला.
गोपनीय माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने शैलेष खेडकर याच्या आंबा गावात धडक दिली. तर पोलीस आल्याची कुणकुण लागताच शैलेषने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग करत त्याला ताब्यात घेतले. तसेच त्याची चौकशी केली असता त्यांनी मोटारसायकल चोरीची कबुली दिली. सोबतच चोरलेल्या दुचाकी गावातील गट क्रमांक 14 मधील शेतात लपवून ठेवल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी शेतात जाऊन पाहणी केली असता, त्याच्या शेतात एकुण 14 लाख 95 हजार रुपये किंमतीच्या 24 चोरीच्या मोटरसायकली मिळून आल्या.
साथीदाराकडे आढळून आल्या 12 चोरीच्या मोटरसायकली
शैलेषला ताब्यात घेतल्यावर त्याच्या आणखी साथीदार व मोटरसायकलीबाबत पोलिसांनी विचारपुस केली. यावेळी त्याने आपल्याच गावातील विजय अळींग याच्याकडे काही मोटरसायकली विक्री करण्यासाठी दिल्याची माहिती दिली. त्यामुळे पोलिसांनी विजय अळींग याच्या शेतात छापा टाकत त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडे देखील एकूण 7 लाख किंमतीच्या 12 चोरीच्या मोटरसायकली मिळून आल्या.
प्रोझोन मॉलमधून चोरल्या दुचाकी...
पोलीस गावात आल्याची माहिती मिळताच शैलेषने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला बेड्या ठोकल्या. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने चोरलेल्या बऱ्याच मोटरसायकली या प्रोझोन मॉल येथुन चोरल्याची कबुली दिली आहे.
संबंधीत बातमी...
मॉल्सच्या पार्किंगमध्ये दुचाकी 'पार्क' करत असाल तर काळजी घ्या, बसू शकतो मोठा फटका