Aurangabad: औरंगाबादची वाटचाल 'क्राईम कॅपिटल'कडे; शहरात सहा महिन्यांत तब्बल 25 खून
Aurangabad Crime News: जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यात तब्बल 31 जणांच्या हत्या झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
Aurangabad Crime News: गतवर्षीच्या तुलनेत अवघ्या सहा महिन्यात औरंगाबाद शहरातील खुनाच्या घटनेत तीन ते चार पटीने वाढ झाली आहे. गेल्या सहा महिन्यात औरंगाबाद शहरात 25 खून झाले आहेत. तर ग्रामीण भागात 6 खुनाच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यात तब्बल 31 जणांच्या हत्या झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. विशेष म्हणजे यातील बहुंताश हत्या या कौटुंबिक करणातून झाल्या असून, काही ठिकाणी एक गुन्हेगार दुसऱ्याला संपवत असल्याचे प्रकार सुद्धा समोर आले आहेत.
मराठवाड्याची राजधानी आणि आशिया खंडात सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर म्हणून ओळख असलेल्या औरंगाबाद शहरात गेल्या काही दिवसांपासून खुनाच्या घटना वाढल्या आहेत. 2021 मध्ये वर्षभरात शहरात 15 खून झाले होते. मात्र यावर्षी सहा महिन्यातच 25 जणांची हत्या झाली आहे. या हत्यांची अनेक कारणे असली तरीही, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये होणाऱ्या वादातून होत असलेल्या हत्येच्या घटना मात्र गंभीर आहे. विशेष म्हणजे हत्याच्या घटनांमधील आरोपी गुन्हा करतांना नशेत असल्याचे सुद्धा अनेक घटनांमधून समोर आले आहे. त्यामुळे औरंगाबादची वाटचाल 'क्राईम कॅपिटल'कडे तर होत नाही ना? असा प्रश्न सर्वसामन्यांना पडत आहे.
खुलेआम 'नशाखोरी'...
कधीकाळी औद्योगिक विकासामुळे माध्यमांमध्ये चर्चेत राहणारे औरंगाबाद आता, शहरात पसरलेल्या 'नशेच्या बाजारा'मुळे चर्चेत आला आहे. गल्लीबोळात सहजपणे कुठेही नशेच्या गोळ्या मिळत आहे. एवढच नाही तर या गोळ्या थेट गुजरातमधून औरंगाबादमध्ये येत असल्याचे सुद्धा पोलिसांच्या कारवाईतून समोर आले होते. हा बाजार एवढा वाढला आहे की, रिक्षा चालक, किराणा दुकानदार, आणि मेडिकल चालक सारख्या लोकांनी या काळ्या बाजारात उडी घेतली आहे. यामुळे शहरातील तरुण मोठ्याप्रमाणावर नशेच्या आहारी जात, असून त्यातून छोट्या-मोठ्या गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत.
ग्रामीण भागात सुद्धा सहा खून...
औरंगाबाद ग्रामीण पोलीस हद्दीत सुद्धा तब्बल सहा खुनाच्या घटना समोर आल्या होत्या. ज्यात बिडकीन हद्दीतील एका महिलेच्या खुनाच्या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांनी तीन-चार दिवसांत आरोपीला बेड्या ठोकल्या. परंतु गंगापूर येथे झालेल्या एका खुनाच्या घटनेत अजूनही आरोपी सापडलेला नाही. त्यामुळे औरंगाबाद शहरातील आणि ग्रामीण भागातील खुनाच्या घटना औरंगाबादकरांना हादरा देणाऱ्या आहेत.