औरंगाबादेत विनामास्क फिरणाऱ्या इसमाकडून पोलिसांनाच मारहाण, एक पोलीस गंभीर जखमी
नियमानुसार गाडीत दोनहून अधिकजण प्रवास करत असतील तर मास्क घालणे बंधनकारक आहे. मात्र गाडीत दोनजण असतानाही मास्क घातलेला नव्हता म्हणून पोलिसांनी त्यांना थांबवले तर आरोपीने पोलिसांनाच मारहाण केली.

औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध कडक करण्यात आले आहेत. कोरोनासंबंधीचे नियम हे नागरिकांच्या हितासाठीच आहेत हे काहींना कळत नाहीत. पोलीस नागरिकांच्या हितासाठी रात्रंदिवस कार्यरत असतात. मात्र या पोलिसांना मारहाणीची घटना औरंगाबादेत समोर आली आहे. स्वत:ला एनएसजी (NSG) कमांडो सांगत एकाने पोलिसांना मारहाण केली आहे. या प्रकरणी पोलिसांना गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
नेमकं काय घडलं?
औरंगाबादेत कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याच दरम्यान औरंगाबाद छावणी परिसरात एक चार चाकी गाडी आली. त्यातील दोन्ही व्यक्तींनी मास्क घातले नव्हते. ती गाडी पोलिसांनी अडवली. गाडीत बसलेल्या व्यक्तीला मास्क का घातला नाही याची पोलिसांनी विचारणा केली. त्यावेळी गाडीत बसलेल्या एका व्यक्तीने स्वतःला NSG चा कमांडो असल्याचं सांगत उलट पोलिसांनाच मारहाण करायला सुरुवात केली. या मारहाणीत एपीआय भागीले यांना जबर मारहाण करण्यात आली आहे. छावणी भागात ही मारहाण झाली आहे. एपीआय भागीले यांच्या डोळ्याला आणि जबड्याला दुखापत झाली आहे.

एपीआय भागीले यांना मारहाण करणारा गणेश गोपीनाथ भुमे हा एनएसजी सेंट्रल पोलीस फोर्समध्ये कार्यरत आहे आणि दिल्लीला राहतो, असे त्याने सांगितले आहे. तो फुलंब्री येथे राहणारा आहे आणि सुट्टीवर आला आहे, असं त्याचे म्हणणे आहे. कोरोना प्रोटोकॉलनुसार गाडीत दोनहून अधिकजण प्रवास करत असतील तर मास्क घालणे बंधनकारक आहे. मात्र यांनी गाडीत दोघे असून देखील मास्क घातलेला नव्हता म्हणून पोलिसांनी त्यांना थांबवले तर आरोपीने पाहिले कॉन्स्टेबलला मारहाण केली. त्यानंतर एपीआय मध्यस्थी करायला गेले तर त्यांनाही मारहाण केली. दरम्यान या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
यापूर्वीदेखील औरंगाबाद लॉकडाऊन दरम्यान पोलिसांना मारहाण करण्याच्या दोन घटना घडल्या होत्या. कालच औरंगाबाद शहरात कडक निर्बंध लागू केले आहेत. शहरात 5 वाजेनंतर संचार करण्यास बंदी आहे. त्यात पोलिसांनी अडवणूक केल्यानंतर अशी मारहाण होत असेल तर रस्त्यावर पोलीस काम करतील का? हाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.























