FIR against Raj Thackeray : राज ठाकरे यांच्यावर नेमका कोणत्या कलमांतर्गत गुन्हा?
FIR against Raj Thackeray : औरंगाबादमधील सभेदरम्यान नियम अटी न पाळल्याने सिटी चौक पोलीस ठाण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.राज ठाकरे यांच्यावर नेमका कोणत्या कलमांतर्गत गुन्हा?

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर अखेर गुन्हा दाखल झाला आहे. राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी 1 मे रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेतली होती. या सभेला अटी शर्तींसह परवानगी दिली होती. मात्र या सभेदरम्यान नियम अटी न पाळल्याने औरंगाबादेतील सिटी चौक पोलीस ठाण्यात राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबादच्या सभेत त्यांनी मशिदींसमोरील भोंगा हटवला नाही तर दुप्पट आवाजाने हनुमान चालीसा लावू असा इशारा दिला होता. त्यासाठी 4 मे रोजीचा अल्टिमेटम दिला होता.
राज ठाकरेंवर नेमका कोणत्या कलमांतर्गत गुन्हा?
औरंगाबादमधील सिटी चौक पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गजानन इंगणे यांच्या फिर्यादीनंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. सिटी चौक पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार राज ठाकरे हे प्रथम क्रमाकांचे आरोपी आहेत. राज ठाकरेंसह सभेला परवानगी मागणारे राजीव जवळीकर आणि इतर आयोजकांवर गुन्हा दाखल झाला आहे. सिटी चौक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक गिरी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
कलमं - 116, 117, 153 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 (अटी शर्तींचा भंग करणे)
153 - दोन समूहात भांडण लावणे
116 - गुन्हा करण्यासाठी मदत
117 - गुन्ह्याला मदत करणे, चिथावणीखोर भाषण
Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल, अटक होणार?
रस्त्यावर उतरुन नागरिकांना त्रास होईल असं कृत्य करु नका : शंभूराज देसाई, गृहराज्यमंत्री
राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी मनसेला शांततेचं आवाहन करत कायदा हातात न घेऊ नये असं म्हटलं आहे. अटी-शर्तींसह औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी मनसेच्या सभेला परवानगी दिली होती. या सभेदरम्यान अटी-शर्तींचं उल्लंघन झालं असेल तर आयुक्तांनी त्यांचा अधिकार वापरुन कारवाई केली असेल. कायदा सगळ्यांसाठी समान आहे. हे कायद्याचं राज्य आहे. कायदा हातात घेऊन रस्त्यावर उतरायचं हे चालणार नाही. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्राचे पोलीस सज्ज आहेत. मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना आवाहन करतो की, कायद्याला कायद्याने काम करु द्या, पोलिसांना त्यांचं काम करु द्या. कारवाई योग्य वाटत नसेल तर न्यायालय आहे, तिथे न्याय मागा. पण रस्त्यावर उतरुन सामान्य नागरिकांना त्रास होईल असं कृत्य करु नये, असं शंभूराज देसाई म्हणाले.
मनसेच्या नेत्यांना पोलिसांकडून नोटीस
राज ठाकरे यांच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झालेल्या सभेनंतर मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नोटीस पाठवल्या जात आहेत. राज ठाकरे यांच्या सभेनंतर दोन समाजात तेढ निर्माण होण्याची पोलिसांनी शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे आपण तेढ निर्माण होईल असं कुठलंही कृत्य करु नये म्हणून पोलिसांनी नोटीस पाठवल्या आहेत. मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे यांनाही पोलिसांना नोटीस पाठवल्या आहेत.























