Cotton Stolen : गोदामात ठेवलेला 40 क्विंटल कापूस लंपास; औरंगाबादच्या सोयगाव तालुक्यातील घटना
Aurangabad News : नोटी गावात गायकवाड यांची गट नं. 162, 167 मध्ये सहा हेक्टर जमिनीत कपाशीची लागवड करण्यात आलेली होती.
Aurangabad Cotton Theft News : यंदा कापसाला (Cotton) चांगला भाव मिळत असल्याने कापूस चोरीच्या (Cotton Theft) घटना सतत समोर येत आहे. दरम्यान असाच काही प्रकार औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad District) सोयगाव तालुक्यात समोर आला आहे. वठाण गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गोदामात साठवून ठेवलेला चाळीस क्विंटल कापूस मध्यरात्री चोरीला गेला. बाबुलाल कचरू गायकवाड असे कापूस चोरी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. नोटी गावात गायकवाड यांनी गट नं. 162, 167 मध्ये सहा हेक्टर जमिनीत कपाशीची लागवड करण्यात आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतात वेचणी केलेला कापूस ठेवण्यासाठी बाबुलाल गायकवाड यांनी वरठाण-गोंदेगाव रस्त्यावर पत्राचे शेड उभारले आहे. या शेडमध्ये जवळपास 80 क्विंटल कापूस साठवून ठेवला होता. मात्र रात्रीच्या वेळी शेतात कोणी नसल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी गोदामाचे कुलूप तोडून शेडमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर कपाशी भरलेल्या चाळीस गोण्या आणि मोकळा पडलेला तीस क्विंटल कापसासह एक ज्वारीची गोणी चोरट्यांनी लंपास केली. यात शेतकऱ्याचे अंदाजे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सोयगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे. तर बनोटी, गोंदेगाव, तिडका, नागद रस्त्यावर उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. काहीही संशयास्पद हालचाल तसेच वाहन आढळून आले नसल्याचे सांगण्यात आले. चोरटे कोणत्या मार्गाने गेले असतील याचा अंदाज घेत तपास सुरू आहे. पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीधर गिते, राजू बरडे, विकास दुबिले, श्रीकांत तळेकर पुढील तपास करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
घरी जाताच लक्ष ठेवून केली चोरी
गायकवाड हे वेचून ठेवलेला कापूस पत्र्याच्या शेडमध्ये ठेवत होते. तसेच रात्री मुक्कामासाठी त्याच ठिकाणी थांबायचे. तसेच सध्या वीजपंपाला रात्रीचा वीजपुरवठा होत असल्याने गेल्या पाच दिवसांपासून शेतातील कपाशी पिकाला पाणी देण्याचे काम गायकवाड यांच्याकडून केले जात आहे. तर कपाशीस पाणी दिल्यानंतर ते पत्र्याच्या शेडमध्ये झोपत होते. मात्र शुक्रवारी रात्री थंडीच्या प्रमाणात वाढ झाल्याने ते शेतातून आठ वाजता बनोटी येथील घरी निघून गेले. हीच संधी साधून चोरट्यांनी कपाशीवर डल्ला मारला.
महत्वाच्या इतर बातम्या :
Aurangabad : नायलॉन मांजावर संक्रात! औरंगाबाद पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल 15 लाखांचा मांजा जप्त