(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रेमडेसिवीर इंजेक्शनवरुन भाजप खासदार सुजय विखे अडचणीत? कोर्टाने संपूर्ण माहिती मागवली
रेमडेसिवीर इंजेक्शनवरुन भाजप खासदार सुजय विखे यांच्या अडणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने यासंदर्भात संपूर्ण माहिती मागवली आहे.
औरंगाबाद : भाजप खासदार सुजय विखे यांनी खाजगी विमानाने अहमदनगरला आणलेल्या 10 हजार रेमडेसिवीर इंजेक्शनवरुन त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या विमान प्रवासाबाबत आणि आणलेल्या सामानाबाबत पूर्ण माहिती मागवली आहे. सोबतच 10 ते 25 एप्रिलपर्यंत किती खाजगी विमानं आली आणि त्यात काय सामान होते? याचीही माहिती कोर्टाने मागितली आहे.
विमानतळ प्राधिकरणाने ही सगळी माहिती कोर्टाला द्यायची आहे. सोबतच नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत सुजय विखे यांनी केलेल्या कृतीचे समर्थन केले होते. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या या कृतीवरही कोर्टाने संशय आणि नाराजी व्यक्त केलीय. जिल्हाधिकारी यांचे वर्तन विखेंना वाचवण्यासारखे असल्याचं कोर्टाने म्हटलंय, भाजप खासदार असलेले सुजय विखे पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यात खाजगी विमानाने रेमडेसिवीर आणले होते. त्यानंतर याबाबत वाद सुरू झाला होता आणि हायकोर्टात याचिका सुद्धा दाखल झालीय. या याचिकेवर पुढील सुनवणी 3 मे रोजी होणार आहे.
औरंगाबाद खंडपीठात चार याचिकाकर्त्यांनी याचिका दाखल केली आहे. यात अरूण कडू यांच्यासह इतर तीन जणांचा समावेश आहे. 10 हजार रेमडेसिवीर 24 तारखेला आणले आहेत. यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेतून काही प्रश्न उपस्थित केले असून गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. रेमडेसिवीर खरेदी वाटपाची परवानगी नसताना कसंकाय आणले. सध्या पुर्ण भारतात आणि दिल्लीत कमतरता असताना हे इंजेक्शन मिळाले कसे? जिल्हाधिकारी यांच्यामार्फत ही खरेदी का नाही झाली? 26 तारखेला नोटीस काढली होती. 10 इंजेक्शन कुठे गेले? ते खरे आहेत का? असे सवाल खंठपीठासमोर उपस्थित केले आहेत.