(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raosaheb Danve: 489 कोटींच्या रस्त्याचं काम अवघ्या 289 कोटींमध्ये होणार? रावसाहेब दानवेंच्या भावाला औरंगाबाद-पैठण रस्त्याचं टेंडर
Aurangabad : खड्ड्यांमुळे नेहमी चर्चेत असलेल्या औरंगाबाद-पैठण रस्त्याचं टेंडर रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या भावाला मिळणार आहे.
Aurangabad Paithan Road : औरंगाबाद-पैठण रोड आधी खड्ड्यांमुळे प्रसिद्ध, नंतर तीनवेळा झालेल्या उद्घाटनामुळे आणि आता त्याच्याच टेंडरमुळे चर्चेत आला आहे. कारण आता औरंगाबाद ते पैठण रस्त्याचं चौपदरीकरण होणार आहे. त्याच्याच कामासाठी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणानं कंत्राट काढलंय. हे कंत्राट 489 कोटींचं आहे पण हे कंत्राट अवघ्या 289 कोटींमध्ये मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे अपेक्षित रक्कमेच्या 41.02 टक्के कमी दरात, आणि हे कंत्राट मिळतंय ते रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या भावाला.
रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघातील नेहमी चर्चेत असलेला आणि कधी होणार असा प्रश्न कायम असलेल्या औरंगाबाद ते पैठण या रस्त्याच्या चौपदरीकरणाला आता मुहूर्त लागेल अशी शक्यता दिसते आहे. या रस्त्याच्या कामाचे टेंडर एनएचआयने काढले. त्यासाठी 489 कोटी रुपयाचे टेंडर आहे. मात्र रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे चुलत भाऊ आणि भाजपचे पदाधिकारी भास्कर दानवे यांनी 489 कोटी रुपयांचे काम फक्त 289 कोटींमध्ये म्हणजे 41.02 टक्के कमी दरात करण्याची तयारी दर्शवली आहे.
औरंगाबाद-पैठण या रस्त्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या 42 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे दुसऱ्यांदा भूमीपूजन केलं आहे. 1670 कोटींची तरतूद असलेल्या या कामात 111 हेक्टर भूसंपादन करावे लागणार होते. मात्र रस्त्याच्या दुतर्फा औरंगाबादची संभाव्य जलवाहिनी जाणार असल्याने भूसंपादन रद्द झाले.
या रस्त्यासंबंधी 490 कोटी रुपयांत डांबरीकरणाची निविदा निघाली. तेव्हा ठेकेदारांकडून 400 ते 450 कोटी रुपयांची अपेक्षा केली जाईल असे म्हटले जात होते. भास्कर दानवेंनी प्रत्यक्षात 289 कोटींतच कामाची तयारी दाखवली आहे.
या संबंधी भास्कर दानवेंनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "येत्या महिनाभरात तांत्रिक बाबींची पूर्तता करून जानेवारी 2023 मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. त्यानंतर दीड वर्षात रस्ता तयार होणार आहे. पण प्रश्न हा आहे एवढ्या कमी दराने टेंडर घेतलं असेल तर त्याचा दर्जा काय असेल की काम पूर्ण होई पर्यंत कामाची किंमत तीन-चार पटीने वाढेल याचं उत्तर येणारा काळच देईल."
औरंगाबादचे पालकमंत्री संदिपान भूमरे यांनी यासंबंधी चांगल्या कामाचं अश्वासन दिलंय. पण जिथं दुप्पट पैसे खर्च करुनंही रस्ते खड्डे मुक्त होत नाहीत, तिथं 41 टक्के कमी किंमतीत झालेल्या रस्त्याचा काय दर्जा असेल हे लवकरच कळेल.