Aurangabad : औरंगाबादमध्ये उद्या भाजपचा 'जल आक्रोश मोर्चा'; पाण्यावरून भाजप-सेनेत बॅनरबाजी
Jal Akrosh Morcha : आम्ही पाणीपट्टी अर्ध्यावर आणली, तुम्ही गॅसचे भाव अर्ध्यावर आणणार काय? या आशयाचे बॅनर शिवसेनेने लावले आहेत.
औरंगाबाद: शहरात पाण्यावरून राजकारण तापले असतानाच आता याच पाण्यावरून शिवसेना-भाजपमध्ये बॅनरबाजी रंगल्याचे दिसून आले आहे. पाटील खडकेश्वर मंदिराच्या समोर भाजपने लावलेल्या जल आक्रोश मोर्चाचा बॅनरच्या शेजारीच शिवसेनेने देखील बॅनर लावून प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही पाणीपट्टी अर्ध्यावर आणली, तुम्ही गॅसचे भाव अर्ध्यावर आणणार काय? या आशयाचे बॅनर शिवसेनेच्यावतीने भाजपच्या बॅनरच्या बाजूला लावण्यात आले आहे. यावरून सेना-भाजपमध्ये बॅनर युद्ध सुरू असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेने लावलेले हे बॅनर चर्चेचा विषय ठरत आहे.
दरम्यान औरंगाबाद-भाजपच्या जल आक्रोश मोर्चाचे बॅनर अज्ञाताने फाडल्याची घटना घडली आहे. औरंगाबादच्या पडेगाव भागात लावलेले बॅनर फाडल्यानं तणाव निर्माण झाला आहे. बॅनर फाडलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते जमा झाले होते. त्यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्न अधिकच गंभीर बनला असून यावरून आता राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. 23 तारखेला भाजपकडून भव्य असा 'जल आक्रोश मोर्चा' काढला जाणार आहे. आगामी काळात औरंगाबाद महानगरपालिका निवडणुका होणार आहे.त्यामुळे या निवडणुकीत पाणी प्रश्न आघाडीवर असण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे गेले अनेक वर्षे शिवसेनेसोबत महानगरपालिकेत भाजप सत्तेत असतानाही, पाणी प्रश्न दोन्ही पक्षाला सोडवता आला नाही. मात्र निवडणुकीच्या तोंडावर भाजप कडून पाणी प्रश्नावरून शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्नावरून सर्वच पक्षाकडून राजकारण केलं जाण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासुन औरंगाबाद शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून सर्वसामान्य नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे याच मुद्यावरून भाजपाकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. तर भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून सतत आंदोलनं केली जात आहेत. त्यांनतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली 23 तारखेला भव्य असा 'जल आक्रोश मोर्चा; काढण्यात येणार आहे.