Aurangabad Accident: औरंगाबादमधील कायगावजवळ दोन कारचा भीषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यू
Aurangabad Accident News: स्विफ्ट आणि वॅग्नर कारचा अपघात झाला. अपघातामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
Aurangabad Accident News: अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावरील (Ahmednagar Aurangabad Highway) कायगावजवळील गोदावरी शाळेच्या समोर शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास दोन कारचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पहिली कार दुभाजक ओलांडून दुसऱ्या कारला जाऊन धडकल्याने अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात मृत्यू झालेले चौघेही औरंगाबादच्या वाळूज भागातील बजाजनगर येथील व्यावसायिक होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, अहमदनगरहून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या स्विफ्ट कारच्या (क्रमांक एम.एच.20 सी. एस. 5982 ) चालकाला कायगाव जवळ वळणाचा अंदाज न आल्याने त्यांची भरधाव कार दुभाजकावर आदळून विरुद्ध दिशेने गेली. दरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या वॅग्नर कारला (एम.एच.27 बी. झेड. 3889) जाऊन स्विफ्ट कार धडकली. ज्यात स्विफ्टमध्ये असलेले चौघेजण गंभीर जखमी झाले होते. तर घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्त कारचे दरवाजे तोडून जखमींना बाहेर काढत, गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र जखमी झालेल्या चौघांनाही डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
मृतांमध्ये रावसाहेब मोटे (वय 56), सुधीर पाटील (वय 45), रतन बेडवाल (वय 38), भवसिंग गिरासे ( वय 38) ( सर्व रा. वाळूज महानगर) समावेश आहे. तर मृत चौघेही मित्र असून प्लॉटिंगचा व्यवसाय करीत होते. तर चौघेही एका व्यवहारासंदर्भात नगरला गेले होते. दरम्यान परतताना प्रवरासंगम येथे जेवण करून बजाज नगर येथे घरी जात असताना अपघात झाला.
दुसऱ्या गाडीतील पाच जखमी...
स्विफ्ट कारमधील चौघांचा मृत्यू झाला आहेत. तर दुसऱ्या वॅग्नर गाडीतील पाच जण जखमी झाले आहे.ज्यात शशिकला कोराट(वय 70) सिद्धार्थ जंगले (वय 14 ) हेमंत जंगले (वय 55) छाया जंगले (वय 35 ) शंकुतला जंगले (वय 70) हे पाचजण जखमी झाले आहे. या पाचही जखमींना 108 रुग्णवाहिकेद्वारे औरंगाबाद येथील शासकीय घाटी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वॅग्नर कारमधील जखमी प्रवासी अमरावतीहून देवगड येथे देव दर्शनासाठी मुक्कामी जात होते.
महामार्गावर वाहतूक कोंडी...
अहमदनगर-औरंगाबाद सतत वाहतूक सुरू असते. औरंगाबादहून पुण्यासाठी जाणारे वाहनं देखील याच मार्गाने जातात. त्यामुळे रात्री अपघात झाल्यानंतर अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. दोन्ही बाजूने लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे अपघातस्थळी रुग्णवाहिकेला देखील जाण्यासाठी मार्ग नव्हता. त्यामुळे परिसरातील शेतातून रुग्णवाहिका अपघातस्थळी नेण्यात आली. मात्र त्यानंतर पोलिसांनी अथक परिश्रमानंतर वाहतूक सुरळीत केली.