(Source: ECI/ABP News/ABP Majha)
औरंगाबाद महानगरपालिकेत 150 कोटींचा कथित 'ऐनवेळीचा प्रस्ताव' घोटाळा कसा झाला?; प्रकरण थेट न्यायालयात जाणार
Scam: घोटाळ्याची चौकशी न झाल्यास आपण थेट न्यायालयात जाणार असल्याचा इशारा खासदार जलील यांनी दिला आहे.
Aurangabad Municipal Corporation Scam: महानगरपालिका निवडणुका तोंडावर असताना स्थानिक राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच भ्रष्टाचाराचे (Scam) आरोप-प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान औरंगाबाद महानगरपालिकेत (Aurangabad Municipal Corporation) देखील दीडशे कोटींचा 'ऐनवेळीचा प्रस्तावा'चा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी केला आहे. 2017 ते 2022 पर्यंत औरंगाबाद महानगरपालिकेत तब्बल 202 प्रस्तावांना नियमबाह्यरीत्या मंजुरी देण्यात आल्याचा आरोपही जलील यांनी केला आहे. तर याबाबत चौकशी न झाल्यास आपण थेट न्यायालयात जाणार असल्याचा इशारा देखील जलील यांनी दिला आहे.
याबाबत बोलतांना जलील म्हणाले की, शिवसेना-भाजपच्या काळात औरंगाबाद महानगरपालिकेत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. ऐनवेळीचा प्रस्तावाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचे कामे दाखवण्यात आले. मुळात हि कामे झाली की नाहीत याबाबत तपासा करण्याची गरज आहे. तर 2017 ते 2022 या काळात औरंगाबाद महानगरपालिकेत तब्बल 202 प्रस्तावांना नियमबाह्यरीत्या मंजुरी देण्यात आल्याचा आरोपही जलील यांनी केला आहे. तर या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मनपा आयुक्त यांच्याकडे केली असून, त्यांनी चौकशी न केल्यास आपण न्यायालयात जाणार असल्याचा दावा देखील जलील यांनी केला आहे.
'ऐनवेळीचा प्रस्ताव' घोटाळा कसा झाला? (जलील यांनी केलेल्या आरोपानुसार)
- सभा कामकाज जादा नियमाचे नियम क्र. 6 चा भंग झालेला आहे. इतिवृत्त पालिका सदस्याकडे कायम करण्यापुर्वी पाठविले नाही. कार्यक्रम पत्रिकेसोबत पाठविल्यास ते वाचण्याची गरज नाही. परंतू तसे झाले नाही कींवा इतिवृत्त वाचून दाखविले नाही
- अनेक महीने प्रस्ताव प्रलंबित ठेवून विषय पत्रिकेवर न घेता ऐनवेळी विषय घेण्यात आलेले आहेत.
- मालमत्ता कर आकरणी बाबत नियम 1 के चा भंग केलेला आहे. ऐनवेळेसाठी स्थायी समितीची शिफारस नाही. अत्यंत महत्वाचा विषय असतांना सभागृहापुढे न ठेवता विना चर्चा नियमबाहय मंजूरी देण्यात आली.
- म. प्रा. व न. र. अधिनियमचे कलम 137 अन्वये विषयामध्ये फेरबदल करणे. ऐनवेळेसाठी आयुक्तांची शिफारस नाही, हितसंबंध जोपासलेला दिसतो. महत्वाचा विषय पटलावर घेतला नाही.
- ऐनवेळेसाठी पालिक सदस्याचा प्रस्ताव नियम १ज प्रमाणे व 1 ज प्रमाणे व 1 के प्रमाणे ऐनवेळी घेता येत नाही. सभागृहाच्या पटलावर ठेवलेले नाही. अर्थिक विषय ऐनवेळी घेणे अपेक्षीत नाही.
- महापौर नगरसचिव यांना प्राप्त प्रस्ताव कार्यक्रम पत्रिकेवर प्रस्ताव घेता आला असता, परंतू 1 महीना 6 दिवासाचा कालावधी मिळवून देखिल जाणीवपुर्वक वेळी घेण्यात आला.
- महापौर व नगरसचिव कार्यालयास अनेक प्रस्ताव प्राप्त झाल्याचे त्यांच्या आवक रजिस्टर मध्ये नोंद नाही. परंतू मंजूरी देण्यात आली.
- प्रस्ताव सभेच्या कार्यक्रम पत्रिकेवर घेणे शक्य होते, परंतु काही कारण नसतांना कार्यक्रम पत्रिकेत समाविष्ट केले नाही. सभेच्या पटलावर घेण्यात आले नाही. सभा झाल्यानंतर जाणीवपुर्वक सदस्यांना वितरीत झालेला नाही. ऐनवेळी घेण्यात आहे असे भासवून सभा झाल्यानंतर इतिवृत्तांत विषय घुसडलेले आहेत. ही अत्यंत गंभीर स्वरुपाची बाब आहे.
- प्रस्ताव महापौर यांच्याकडे सभा संपन्न झाल्यानंतर अनेक दिवसांनी प्राप्त झाला असतांना, ऐनवेळी घेण्यात आला असे भासवून सभा झाल्यानंतर इतिवृत्त विषय घुराडलेला आहे.
- मनपा व्यापारी संकुलातील गाळे भाडयाने देणे, आर्थिक मदत देणे, वेतन श्रेणी देणे, संस्थेस आर्थिक मदत देणे, निधी उपलब्ध करणे, चौकशीतून मुक्त करणे, ऐनवेळी घेण्यात आला असे भासवून सभा झाल्यानंतर इतिवृत्तांत विष घुसडलेला आहे.