(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad Crime: तू मला खूप आवडते म्हणत तरुणीचा हात धरत काढली छेड; पोलिसात गुन्हा दाखल
Aurangabad Crime News: या प्रकरणी आरोपीविरोधात वाळूज ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
Aurangabad Crime News: औरंगाबादच्या (Aurangabad) वाळूज महानगर (Waluj Mahanagar) परिसरात एक संतापजनक प्रकार समोर आला असून, तू मला खूप आवडते म्हणत 18 वर्षीय तरुणीचा हात धरत एकाने छेड काढली आहे. तर मुलीचा पाठलाग करून छेड काढल्याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. सलमान सलीम शेख (रा. पंढरपूर) असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाळूज महानगर परिसरात कुटुंबासह राहणारी 18 वर्षीय तरुणीची ओळख शेख सलमान याच्या सोबत झाली होती. दरम्यान 29 डिसेंबररोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास तरुणी बजाजनगरातून घराकडे जात होती. यावेळी आरोपी सलमान याने पाठलाग करून तरुणीचा हात धरला, तसेच तू मला खूप आवडते असे म्हणून त्याने छेड काढली. या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितले. त्यामुळे मुलीच्या आई-वडिलांनी सलमान यास फोन करून यापुढे मुलीला त्रास देऊ नको, असे बजावले होते.
अखेर पोलिसात गुन्हा दाखल...
आपल्या मुलीला त्रास देऊन नको असे पीडीत मुलीच्या आई-वडिलांनी यापूर्वीच आरोपीला समजून सांगितले होते. मात्र असे असताना देखील 7 जानेवारीरोजी रात्री नऊवाजेच्या सुमारास सलमान हा तरुणीच्या घरासमोर आला. त्याने तरुणीला शिवीगाळ करून तुझ्या आई-वडिलांना चाकूने मारून टाकीन अशी धमकी देत निघून गेला. त्यामुळे तरुणीसह तिच्या कुटुंबातील सदस्यांनी पोलीस गाठले. त्यानंतर या प्रकरणी वाळूज ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी शेख सलमान याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन विवाहित महिलांवर अत्याचार...
वाळूज भागातील तरुणीचा छेड काढण्यात आल्याची घटना समोर आली असतानाच जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन विवाहित महिलांवर अत्याचार करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आले आहेत. फुलंब्रीच्या नायगाव येथे राहणाऱ्या 29 वर्षीय विवाहित महिलेवर दीड वर्षांपासून अत्याचार करणाऱ्या व्यक्तीवर फुलंब्री पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या घटनेत कन्नड-औरंगाबाद रस्त्यावरील पाणपोई फाटा येथील लॉजवर एका विवाहित महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कन्नड शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे दोन्ही घटनांमध्ये आरोपीकडून तुमच्या मुलाला मारून टाकील अशा धमक्या देऊन आरोपीने अत्याचार केला आहे.