(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad News: शिवीगाळ करणारा मित्र डोक्यात बसला, म्हणून धारदार दगडाने मुंडके धडावेगळे करत त्याचा जीवच घेतला
Crime News: वाळूज एमआयडीसीत असलेली फतेजा फोर्जिंग या बंद पडलेल्या कंपनीच्या आवारात एका अनोळखी तरुणाचा धारदार वस्तूने शीर धडावेगळे करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.
Aurangabad Crime News: वाळूज महानगर परिसरात एका बंद पडलेल्या कंपनीच्या परिसरात सापडलेल्या मृतदेहाची ओळख पलटी आहे. तर एका तरुणाचे शीर धडावेगळे करून केलेल्या खुनाचा उलगडा करण्यात अखेर पोलिसांना यश आले. मित्रांसोबत दारू पिल्यावर त्यांना शिवीगाळ केल्याने सोबतच्या दोघांनी शिर धडावेगळे करून त्याची हत्या केली असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. अजय व्यंकटराव निलवर्न देशमुख (वय 21 वर्षे, रा. रांजणगाव शे. पु.) असे मयत तरुणाचे नाव आहे. तर निखिल भाऊसाहेब गरड ( वय 19 वर्षे, रा. जळगाव, ता. पैठण. ह. मु. शिवनेरी कॉलनी रांजणगाव शे. पु.) व प्रतीक सत्यवान शिंदे (वय 21 वर्षे, रा. हिवरे, ता. कोरगाव, जि. सातारा ह.मु. शिवनेरी कॉलनी, रांजणगाव) असे हत्या करणाऱ्या आरोपींची नावं असून, पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
वाळूज एमआयडीसीत असलेली फतेजा फोर्जिंग या बंद पडलेल्या कंपनीच्या आवारात एका अनोळखी तरुणाचा धारदार वस्तूने शीर धडावेगळे करून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना 15 जानेवारीला समोर आले होते. दरम्यान पोलिसांनी केलेल्या तपासात हा मृतदेह अजय व्यंकटराव देशमुख याचे असल्याचे स्पष्ट झाले होते. ओळख पटताच पोलिसांनी तपास सुरु केला असता, खुनाच्या घटनेनंतर अजय याचे दोन मित्र गायब झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्यांची अधिक माहिती घेतली असता, निखिल भाऊसाहेब गरड आणि प्रतीक सत्यवान शिंदे असे या दोन्ही मित्रांची नाव असल्याचे पोलिसांना कळाले. त्यामुळे त्यांचा शोध घेत पोलिसांनी 19 जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कल्याण येथून निखील गरड व प्रतीक शिंदे या दोघांना ताब्यात घेतले.
निखील गरड व प्रतीक शिंदे या दोघांना कल्याणमधून ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांना औरंगाबादेत आणले. सुरवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिले, पण दोघांना पोलिसांनी 'खाक्या' दाखवताच त्यांनी अजयचा दगडाने गळा चिरून खून केल्याची स्पष्ट कबुली दिली. अजयसोबत दोघेही 14 जानेवारीला एमआयडीसीत सोबत दारू पित बसले होते. नशेत अजयने या दोघांना शिवीगाळ केली.
मान दगडावर ठेवून धारदार दगडाने मुंडके धडावेगळे केले.
अजयने केलेल्या शिवीगाळीचा राग मनात धरून निखील व प्रतीकने सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अजयला दुचाकीवर बसवून फतेजा फोर्जिंग या बंद पडलेल्या कंपनीच्या आवारात आणले. याठिकाणी दोघांनी नशेत असलेल्या अजय याची मान दगडावर ठेवून धारदार दगडाने त्याचे मुंडके धडावेगळे केले. त्यानंतर दोघांनी मृत अजय याच्या खिशातील 6 हजार रुपये काढून घेत त्याच्या अंगातील शर्ट काढला. तसेच दुचाकीमधून पेट्रोल काढून त्यांनी वाळलेले काटेरी झुडपे मृत अजय याच्या मृतदेहावर टाकून आग लागून ते अजय याची दुचाकी घेऊन घटनास्थळावरून पसार झाल्याचे पोलिसांना सांगितले.
यांनी केली कारवाई!
आयुक्त निखील गुप्ता, उपायुक्त दीपक गिन्हे, सहायक पोलिस आयुक्त अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, एमआयडीसीचे वाळूज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप गुरमे, वाळूजचे निरीक्षक सचिन इंगोले, दुय्यम पोलिस निरीक्षक गणेश ताठे, सहायक निरीक्षक एम. आर. घुनावत, गौतम वावळे, काशिनाथ मांडुळे, उपनिरीक्षक संदीप शिंदे, राहुल निर्वळ, चेतन ओगले, सचिन पागोटे, राजेंद्र बांगर, अशोक इंगोले, प्रवीण वाघ, पोलिस अंमलदार बाबासाहेब काकडे, बाळू लहरे, राजाभाऊ कोल्हे, यशवंत गोबाडे, अविनाश ढगे, हनुमंत ठोके, शिवनारायण नागरे, प्रदीप कुटे यांच्या पथकाने केली.
इतर महत्वाच्या बातम्या: