Amravati News : धनगर वाड्यावर अजितदादांचा वाढदिवस साजरा; 6300 मोतीबिंदू शस्त्रक्रिया, वृक्षवाटप
Amravati News : धनगर वाड्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खास उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं.
DCM Ajit Pawar Birthday Celebration : धनगर वाड्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त खास उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या उपक्रमामध्ये अजित पवारांच्या 63 व्या वाढदिवसानिमित्त एका वर्षांत 6300 मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत होणार आहेत. तसेच मेंढपाळ धनगर कुटुंबियांना जंगली वृक्षांचा वाटप करण्यात आलं. धनगर विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष संतोष महात्मे यांच्या हस्ते अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त खास उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.
धनगर वाड्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा वाढदिवस
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस दरवर्षी मेंढपाळ धनगर बांधवामार्फत साजरा करण्यात येतो. या वर्षी सुद्धा विविध समाजपयोगी उपक्रम राबवून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. मेंढपाळ धनगर बांधव आपल्या मेंढ्यांच्या पालन-पोषणार्थ वर्षभर भटकंती करत राहतात. मेंढ्यांच्या चाऱ्याकरिता त्यांना सतत भटकंती करावी लागते. विशेषतः जून ते सप्टेंबर या पावसाळी काळातील चार महिन्यापर्यंत ते डोंगराच्या पायथ्याशी राहुटी करून राहतात.
63 व्या वाढदिवसानिमित्त 6300 मोतीबिंदू शस्त्रक्रिया
मेंढपाळ धनगर विकास मंच महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष संतोष महात्मे यांच्या संकल्पनेतून यावर्षी महाराष्ट्रातील अमरावती, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, बुलडाणा सह अनेक जिल्ह्यातील धनगर वाड्यावर प्रती जिल्ह्यात 6300 वृक्ष लागवड करण्यात येऊन वृक्ष संगोपनाची काळजी घेण्याबाबत उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यातील मेंढपाळ धनगर वाड्यावर विविध समाजपयोगी उपक्रम राबविण्यात आले.
वृक्ष लागवड करत वाढदिवस साजरा
अमरावती जिल्ह्यातील कार्यक्रम आज रविवारी धनगर वाडा, भानखेड शिवार येथे साजरा करण्यात आला. या परिसरात 63 वृक्षांची लागवड करण्यात आली. प्लास्टिक मुक्तीच्या दिशेने पाऊल टाकताना रोपाची पिशवी प्लास्टिकची न वापरता मेंढीच्या लोकरपासून तयार करण्यात आलेल्या पिशवीमध्ये रोप तयार करण्यात ते देण्यात आले. यावेळी सुरेखाताई ठाकरे यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात येऊन इतर धनगर वाड्यावरील बांधवांना वृक्ष वाटप करण्यात आले.
मोफत मोतीबिंदु तपासणी आणि शस्रक्रिया
अमरावती येथील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ, डॉ. अनुभूती पाटील आणि त्यांचे टीमने धनगर वाड्यावरील सर्व उपस्थित महिलांची आरोग्य तपासणी केली. यावेळी महिलांच्या आरोग्य विषयक प्रश्नावर विस्तृत माहिती दिल्या गेली. स्त्री रोगाविषयी, त्यांच्या आरोग्याच्या काळजी विषयी, निगा राखण्याविषयी योग्य मार्गदर्शन करण्यात आले. महात्मे आय हॉस्पिटल नागपूर तर्फे मोफत मोतीबिंदु तपासणी करून शस्त्रक्रिया करता 170 रुग्णांची निवड करण्यात आली.
मेंढपाळ बांधवांसह इतरांवरही मोफत शस्रक्रिया
वर्षभर शिबिराचे आयोजन करून अजितदांदाचा 63 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने वर्षभरात मेंढपाळ बांधवांसह इतर ही लोकांच्या 6300 मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, आवश्यक रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याकरता महात्मे आय हॉस्पिटल नागपूरला पाठविण्यात आलं आहे.
मेंढी आरोग्य चिकित्सा आणि लसीकरण शिबिर
मेंढपाळ धनगरांना आपल्या पशुच्या पालन-पोषणार्थ भटकंती करावी लागते. यावेळी त्यांच्यासोबत महिला, तरुण आणि लहान मुली सुद्धा असतात त्यांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्याकरिता प्रसिद्ध मार्शल आर्ट प्रशिक्षक महावीर धुलधर, राजेश महात्मे यांनी प्रात्यक्षिक दाखवीत प्रशिक्षण दिले. यानंतर पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद अमरावती आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी विकास महामंडळ, प्रक्षेत्र पोहरा यांच्या वतीने शेळी आणि मेंढीचे आरोग्य चिकित्सा आणि लसीकरण शिबिर राबविण्यात आले. यामध्ये लसीकरण करण्यात येऊन आरोग्य तपासणी करण्यात आली.