Amravati News : राणा दाम्पत्यासोबतच्या वादामुळे चर्चेत, अखेर अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांची बदली!
Amravati News : आपल्या सव्वा दोन वर्षाच्या कार्यकाळात आयुक्त डॉ. सिंह यांनी अनेक गुन्ह्यांची उकल केली. विशेषतः सायबर गुन्हेगारीवर त्यांनी चांगले नियंत्रण मिळवले. मात्र त्यांची कारकीर्द खऱ्या अर्थाने गाजली ती अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्यासोबतच्या वादामुळे.
Amravati News : राज्य सरकारने राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे (Police Officer Transfer) आदेश काढल्यानंतर अमरावतीच्या (Amravati) पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह (Dr. Arti Singh) यांची मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. आपल्या सव्वा दोन वर्षाच्या कार्यकाळात आयुक्त डॉ. सिंह यांनी अनेक गुन्ह्यांची उकल केली. विशेषतः सायबर गुन्हेगारीवर (Cyber Crime) त्यांनी चांगले नियंत्रण मिळवले. मात्र त्यांची कारकीर्द खऱ्या अर्थाने गाजली ती अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यासोबतच्या वादामुळे.
राणा दाम्पत्यासोबत वाद आणि आरती सिंह यांची लोकसभा सचिवालयात पेशी
अमरावतीचे मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर फेब्रुवारी 2022 मध्ये झालेल्या शाईफेक घटनेनंतर आमदार रवी राणा यांच्यासह कार्यकर्त्यांवर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा डॉ. आरती सिंह यांनी दाखल केला. त्यामुळे राणा दाम्पत्य आणि डॉ. सिंह यांच्यात चांगलाच वाद दिसून आला. तत्पूर्वी नोव्हेंबर 2020 मध्ये अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी शेतकऱ्यांसह मुंबईला जाण्याची तयारी करताच डॉ. आरती सिंह यांनी दोघांनाही पोलीस आयुक्त कार्यालयात डिटेन केले. यामुळे देखील चांगलाच वाद झाला होता. पोलिसांच्या या कारवाई विरोधात खासदार राणा यांनी लोकसभा सचिवालयात विशेष अधिकार हनन केल्याची तक्रार दाखल केली, त्यानंतर पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांची लोकसभा सचिवालयात पेशी देखील झाली होती. यासोबत नवनीत राणा यांनी अमरावतीमधील उमेश कोल्हे हत्याप्रकरणात डॉ. आरती सिंह यांना हटवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र देखील लिहिलं होतं. आयुक्तांच्या अपयशामुळे उमेश कोल्हे यांची हत्या झाल्याचं नवनीत राणा यांनी म्हटलं होतं.
सायबर गुन्हे उघड करण्यात डॉ. सिंह यांची मेहनत
डॉ. आरती सिंह यांच्या आयुक्तपदाच्या कार्यकाळात अमरावती शहरात गुन्ह्यांचे प्रमाण काहीसे वाढले असले तरी त्या गुन्ह्यांचा उलगडा देखील तितक्याच जलदगतीने होताना दिसत होतं. विशेषतः सायबर गुन्हे उघड करण्यात डॉ. सिंह यांनी बरीच मेहनत घेतली. ऑनलाईन फ्रॉड झाल्याने चोरीस गेलेल्या नागरिकांचे पैसे देखील त्यांनी परत मिळवले. तसेच इतर गुन्ह्यामध्येही त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांकडून चांगले काम करवून घेतले.
आरती सिंह यांची बदली करुन गृहमंत्र्यांनी अमरावतीकरांना मोठा दिलासा दिला : रवी राणा
डॉ. आरती सिंह यांच्या बदलीनंतर आमदर रवी राणा यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ''पोलीस आयुक्त डॉ आरती सिंह यांची बदली झाली. मला वाटते अमरावतीकर जनता त्यांच्यामुळे त्रस्त झाली होती. महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे यांच्या त्या जवळच्या समजल्या जाणाऱ्या होत्या. अमरावतीमध्ये गुन्हेगारी आरती सिंह यांच्या कार्यकाळात खूप वाढली होती. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांनी आरती सिंह यांची उचलबांगडी करुन महाराष्ट्रात साईड पोस्ट दिली, त्यामुळे गृहमंत्र्यांनी अमरावतीकरांना मोठा दिलासा दिला आहे." अशा शब्दात आमदार राणा यांनी आयुक्तांच्या बदलीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.