अमरावती पदवीधर मतदारसंघातील भाजप-मविआच्या प्रचारात शिवसेनाप्रमुखांचा 'विसर'; दोन्हीकडील शिवसैनिक नाराज
# भाजप-शिंदेगट आणि मविआ उमेदवारांच्या प्रचार फलकांवरून बाळासाहेबांची प्रतिमा 'गायब' झाल्याचं चित्र आहे. यामुळं दोन्ही गटातील सर्वसामान्य शिवसैनिक झालेत नाराज.
Amravati Graduate Constituency election latest updates : राज्यात सध्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अमरावती पदवीधर मतदार संघातील प्रचार सध्या टिपेला पोहोचला आहे. या मतदारसंघात भाजप-शिंदे गट आणि महाविकास आघाडीचे उमेदवार एकमेकांच्याविरोधात शड्डू ठोकून उभे आहेत. येथे भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना अर्थातच 'शिंदे गटा'चे उमेदवार आहेत डॉ. रणजीत पाटील. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा प्रमुख घटक पक्ष असलेल्या महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत धीरज लिंगाडे. या दोन्ही आघाड्या राज्याच्या राजकारणातल्या एकमेकांच्या कट्टर राजकीय विरोधक. महाविकास आघाडीचं सरकार खाली खेचत राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर हे राजकीय वैर आणखी गडद झालं आहे. मात्र, या दोन्ही आघाड्यांमधला एक धागा मात्र समान आहे. हा धागा आहे शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा. या दोन्ही आघाड्यांच्या प्रमुख दैवतांमध्ये बाळासाहेब ठाकरे आहेत. दोन्ही आघाड्यात बाळासाहेबांशी नातं सांगणारे, त्यांचं नाव पक्षात असणारे शिवसेनेचे गट आहेत. सत्ताधारी भाजपसोबत एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील 'बाळासाहेबांची शिवसेना' आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आहे. दोन्ही पक्ष बाळासाहेबांचा वारसा आणि पुण्याई सांगतात.
मात्र, बाळासाहेब 'दैवत' असलेल्या या दोन्ही पक्षांच्या मित्रपक्षांच्या उमेदवाराच्या पोस्टर-बॅनरवरून बाळासेबांचाच फोटो गायब आहे. विशेष म्हणजे भाजप उमेदवार डॉ. रणजीत पाटलांच्या बॅनरवर फक्त एकनाथ शिंदेचाच फोटो आहे. तर मविआचे उमेदवार धीरज लिंगाडेंच्या बॅनरवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो आहेत. अमरावती पदवीधर मतदारसंघातील बाळासाहेबांना दोन्ही आघाड्या विसरण्यावर नेते काहीच बोलत नाही आहेत. मात्र, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना याचं दु:ख असल्याचं अनेक कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत.
भाजप-शिंदे गटाचे उमेदवार डॉ. रणजीत पाटलांचे बॅनर :
अमरावती पदवीधर मतदारसंघातून भाजप-़शिंदे गटाचे उमेदवार म्हणून सध्याचे आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील हे सलग तिसऱ्यांदा रिंगणात आहेत. अमरावती पदवीधर मतदारसंघातील पाचही जिल्ह्यात डॉ. रणजीत पाटील यांच्या लागलेल्या एका बॅनरमुळे शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये काहीशी चलबिचल आहे. हे कारण आहेय त्यावर नसलेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो. डॉ. रणजीत पाटील यांच्या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपाध्यक्ष जे.पी.नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे फोटो आहेत. तर शिंदे गटागडून फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचाच फोटो या बॅनरवर आहे. बॅनरवर घटकपक्ष म्हणून बाळासाहेबांच्या शिवसेनेचं नाव असलं तरी या पक्षाची दैवत असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेंचे फोटो नसल्याने शिंदे गटात नाराजी आहे.
याआधी डॉ. रणजीत पाटलांच्या बॅनरमधून पक्षाचे दोन आमदार गायब :
डॉ. रणजीत पाटील हे अकोला जिल्ह्याच्या भाजपमधील पक्षांतर्गत राजकारणात खासदार संजय धोत्रे गटाचे कट्टर राजकीय विरोधक आहे. डॉ. रणजीत पाटील राज्यमंत्री असतांना या दोन्ही गटातील वाद राज्य पातळीवर गाजले आहेत. रणजीत पाटील आणि धोत्रे गटातील या वादाचं प्रतिबिंब या निवडणुकीच्या सुरूवातीच्या एका बॅनरमध्ये दिसलं होतं. डॉ. पाटील यांच्या बॅनरवरून पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि अकोला पुर्वचे आमदार रणधीर सावरकरांसोबत मुर्तीजापूरचे आमदार हरिष पिंपळे यांचे फोटो गायब होते. अमरावती विभागात भाजपचे विधानसभेवर 15 आमदार आहेत. सावरकर-पिंपळे सोडले तर इतर 13 आमदारांचे फोटो डॉ. पाटलांच्या बॅनरवर होते. मात्र, यातील आमदार रणधीर सावरकर हे डॉ. रणजीत पाटील यांच्या अर्ज दाखल करण्याच्यावेळी उपस्थित होते.
मविआचे उमेदवार धीरज लिंगाडे यांचे बॅनर :
महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांच्या बॅनरवरूनही बाळासाहेबांचा फोटो गायब आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा बाळासाहेबांच्या मुलाचा पक्ष महाविकास आघाडीचा घटक आहे. लिंगाडे यांच्या बॅनरवर काँग्रेसकडून काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, राहूल गांधी, मुकूल वासनिक, नाना पटोले आणि खासदार इम्रान प्रतापढी यांचे फोटो आहेत. राष्ट्रवादीकडून पक्षाध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवारांचे फोटो आहेत. तर शिवसेनेकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवानेते आमदार आदित्य ठाकरेंचे फोटो आहेत.
या फोटो पुराणामुळे दोन्ही आघाडीतल्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. एकीकडे दोन्ही आघाडीतले बाळासाहेबांच्या नावानं राजकारण आणि वारसा सांगणारे पक्ष असतांना त्यांचाच फोटो बॅनरवर नसतांनाही गप्प बसलेले आहेत. नेत्यांच्या राजकारणात कार्यकर्त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या बाळासाहेबांना दोन्हीकडून जाणीवपुर्वक विसरलं गेलं का?, असा प्रश्न सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पडतो आहे.