छत्रपती शिवाजी महाराजांच्या चुकीच्या इतिहासाला मनसेची मुकसंमती? राष्ट्रवादी चित्रपट आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांचा मनसेला सवाल
MNS : वादग्रस्त चित्रपट प्रेमामुळे मनसेची दुपट्टी भूमिका सर्वांसमोर उघड. राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक आणि चित्रपट आघाडीची मनसेवर टीका
MNS Har Har Mahadev : 'हर हर महादेव चित्रपटा'वरून मनसेनं घेतलेल्या भूमिकेवर राष्ट्रवादीच्या चित्रपट आघाडीनं जोरदार टीका केली आहे. पक्षाच्या चित्रपट आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी एक पत्रक काढत मनसेवर टीका करतांना काही प्रश्न विचारले आहेत. राष्ट्रवादीतील जितेंद्र आव्हाड, अमोल मिटकरींसारख्या नेत्यांनी या चित्रटाविरोधात भूमिका घेतल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या चित्रपट आघाडीनंही या चित्रपटाविरोधात मोर्चा उघडला आहे.
काय भूमिका आहे राष्ट्रवादीच्या चित्रपट आघाडीची :
राष्ट्रवादीच्या चित्रपट आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात मनसेवर जोरदार टीका केली आहे. प्रसिद्धीपत्रकात ते म्हणतात की, 'चित्रपटातल्या विसंगतींवरती सातत्याने मनसे चित्रपट सेना अनेकवेळा वेगवेगळे आंदोलनं करून सिनेमे बंद पाडण्यात अग्रेसर असते. मग कधी महाराष्ट्रातल्या ऐतिहासिक पुरुषांच्या झालेल्या अपमानाचा विषय असोत, की अशा कुठल्यातरी चित्रपटामधील एखादे दृष्य जे मनसेला मान्य नसलेल्या विषयावर आधारित चित्रपट बंद पाडण्याचा विषय असो. ही मंडळी सातत्याने चित्रपट बंद पाडण्यात अग्रेसर असते. मात्र अख्या महाराष्ट्रात या दोन चित्रपटांबद्दल गोंधळ माजला असतानाच मनसे मात्र मुग गिळून गप्प का आहे?. त्याचं कारणही असं आहे की दोन्ही चित्रपटांना मनसेने खंबीर पाठिंबा दिला आहे. मग व्यक्ती आणि सोयीचे विषय पाहूनच मनसे आपला स्टॅन्ड घेते का?, असा प्रश्न बाबासाहेब पाटील यांनी उपस्थित केला आहे.
ऐतिहासिक पुरुषांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने सादर केला जात असतांनासुद्धा मनसे चित्रपटाला चित्रपटासारखच बघावं असं का म्हणते?, असा सवाल बाबासाहेब पाटील यांनी केला आहे. मग बाकी सिनेमांना आपण विरोध करतो त्यावेळेस त्यांनासुद्धा आपण चित्रपट म्हणून का बघत नाही. एखाद्या चित्रपटाच्या निर्मात्याने करोडो रुपये खर्च करून चित्रपट बनवतांना तो चित्रपट म्हणूनच जर बघितला तर तो व्यवसायाच्या अनुषंगानेसुद्धा आपण बघू शकतो. मात्र अशावेळी मनसे आक्रमक होऊन असेच चित्रपट बंद पडतात. मग महेश मांजरेकर आणि 'हर हर महादेव'च्या टीमला राज ठाकरे यांनी दिलेला पाठिंबा म्हणजे शिवाजी महाराजांच्या चुकीच्या इतिहासाला मनसेची मुकसंमती आहे का?, असा प्रश्न यावेळी उपस्थित होतो.
मनसेच्या भूमिकेवर राष्ट्रवादी चित्रपट विभागाचे सवाल :
जर असं असेल तर मग महाराष्ट्रात इतिहासाची चुकीची मांडणी करून लोकांना संभ्रमात टाकण्यात मनसेसुद्धा हातभार लावतो का?, असे अनेक प्रश्न बाबासाहेब पाटील यांनी मनसेला विचारले आहेत?. आई भवानी ही शिवाजी महाराजांचे महाराजांचे आराध्य दैवत आहे. शिवाजी महाराजांची मावळे दिवस-रात्र एकत्र करून त्यांच्या इतिहासाला पुनुरूज्जीवीत करण्याचा प्रयत्न करतात. यामूळे जेणेकरून महाराष्ट्र आणि येथील राजकारणाला सातत्याने बळ मिळाले पाहिजे अशी भावना त्यामागे असते. नौसेनेनेसुद्धा नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूरतेचं प्रतीक असलेला झेंडा लावला आहे. ही बाब महाराष्ट्रासाठी भूषणवह आहे. मात्र, चुकीचा इतिहास दाखवून राज ठाकरे अशा विकृत चित्रपटांना हातभार लावत असतील तर तर मनसेने आपली भूमिका स्पष्ट शब्दात मांडावी अशी अपेक्षा बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केली आहे.