Akola Crime : पोटच्या तीन मुलांच्या हत्येचा आरोप असलेल्या बापाची आत्महत्या, अकोला जिल्ह्यातील बोरगांव मंजू शेतशिवारातील घटना
Akola Crime : धोतर्डी येथील रहिवासी असलेला विष्णु दशरथ इंगळे याने काल बोरगांव मंजू रेल्वे परिसरात आत्महत्या केली आहे. परिसरातील झाडाला दोर बांधून गळफास घेत त्याने आत्महत्या केली.
अकोला : अकोला जिल्ह्यातील धोतर्डी गावात पोटच्या तीन मुलांना विष पाजून नंतर त्यांची निर्घृण हत्या केल्याचा आरोप बापावर होता. या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.बी. पतंगे यांच्या न्यायालयात झाली होती. आरोपीविरुद्ध सबळ पुरावा नसल्याने न्यायालयाने आरोपी बापाची निर्दोष सुटका केली आहे. मात्र, कारागृहातून सुटतात त्याने आत्महत्येचं पाऊल उचललं आहे.
धोतर्डी येथील रहिवासी असलेला विष्णु दशरथ इंगळे याने काल बोरगांव मंजू रेल्वे परिसरात आत्महत्या केली आहे. परिसरातील झाडाला दोर बांधून गळफास घेत त्याने आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिसांनी घटनास्थळ गाठले. सद्यस्थितीत या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, विष्णु इंगळे याची हत्येच्या आरोपातून निर्दोष मुक्तता 29 जून रोजी झाली होती. आता कारागृहातून बाहेर येताच त्याने काल आत्महत्या केली आहे.
विष्णूवर नेमके काय होते आरोप?
10 मे 2018 रोजी अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलिस स्टेशन हद्दीतील येत असलेले धोतर्डी हे गाव तिहेरी हत्याकांडाने हादरले होते. आरोपी विष्णुवर त्याच्या तीन मुलांच्या हत्येचा आरोप होता. विष्णूच्या पत्नीचे निधन झाल्याने नैराश्यातून त्याने 17 वर्षीय मुलगा अजय इंगळे, 15 वर्षीय मनोज इंगळे आणि 12 वर्षाची मुलगी शिवानी इंगळे यांना विष पाजून त्यांची पाटा वरवंट्याने डोके ठेचून निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भांदविचे कलम 302, 309 नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. आजपर्यंत आरोपी कारागृहात होता. सदर गुन्ह्याचा तपास केल्यानंतर पोलिसांनी न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकार पक्षातर्फे 16 साक्षीदार तपासण्यात आले. तर आरोपीचे वकिल देवानंद गवई यांनी उलटतपासणीत साक्षीदारांचे म्हणणे खोडून काढले. आरोपीला पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात अटक केली हे सिद्ध करून सांगितले. बचाव पक्षाचे वकिल आणि सरकारी पक्षाच्या युक्तीवादानंतर सबळ पुराव्या अभावी न्यायालयाने आरोपीची निर्दोष सुटका केली.
अंधश्रद्धेतून मुलांची हत्या केल्याचा होता संशय
विष्णूच्या पत्नीचं निधन झाल्यावर तो विमनस्क अवस्थेत गेला होता. त्यातूनच आपल्या मुलांवरही कोणीतरी करणी करेल असा भास त्याला वारंवार होत होता. त्यातूनच सुटका करण्यासाठी त्याने आपल्या तिन्ही मुलांची हत्या केल्याचा आरोप त्याच्यावर होता. यात अटक झाल्यावर तो चार वर्षांपासून तुरूंगात होता. दोन दिवसांपुर्वी प्रकरणातून निर्दोष सुटका झालेल्या विष्णुनंही अखेर आत्महत्या केली आहे. अंधश्रद्धेतून विष्णूचं अख्खं कुटूंबच नेस्तनाबूत झाल्यानं गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.