शिवसेनेतील अकोल्यातील अंतर्गत वादातून मुख्यमंत्री शिंदेंची मोठी कारवाई, गोपीकिशन बाजोरिया यांची संपर्कप्रमुख पदावरुन हकालपट्टी
Akola News: अकोल्यात एकमेकांवर कमिशनचे गंभीर आरोप, एकमेकांच्या तक्रारी, एका गटानं दुसऱ्या गटाच्या पदाधिकाऱ्याच्या घरी तोडफोड अन् हल्ल्याच्या प्रयत्नाचा प्रकार घडला
Akola News : शिंदे गटाचे नेते गोपीकिशन बाजोरिया (Gopikishan Bajoria) यांच्याकडे सोपवण्यात आलेली संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी औट घटकेची ठरली. त्यांची उचलबांगडी करण्यात आली असून खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे बुलढाणा लोकसभेसह अकोला लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुखपदाचीही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया शिंदे गटात दाखल झाल्यानंतर त्यांच्याकडे अकोला लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी सोपवली होती. मात्र त्यांच्या कार्यकाळात अकोला जिल्ह्यात शिंदे गटाला बळकटी मिळण्याऐवजी वादच अधिक झाले होते.
राज्यात सध्या शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटातील वादांची रोजच चर्चा होत आहे. मात्र, सध्या राज्यात चर्चा आहे ती अकोल्यातील शिंदे गटातील गंभीर वादाची. या वादातून एकमेकांवर कमिशनचे गंभीर आरोप, एकमेकांच्या तक्रारी, एका गटाने दुसऱ्या गटाच्या पदाधिकाऱ्याच्या घरी तोडफोड अन् हल्ल्याच्या प्रयत्नाचा प्रकार घडला.
काय आहेत अकोला शिंदे गटातील वाद?
- मुख्यमंत्र्यांनी विशेष विकासनिधी म्हणून दिलेल्या 15 कोटींवरुन बाजोरिया आणि इतर पदाधिकाऱ्यांमध्ये वाद
- बाजोरियांनी पदाधिकाऱ्यांचा निधी स्वत:च लाटल्याचा आरोप
- बाजोरियांना स्वत:च्या प्रकल्पात विकासनिधी वापरल्याचा आरोप
- विरोधी गटाने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात बाजोरियांचा उल्लेख 'कमिशन एजंट' असा केला
- बाजोरिया स्वत:च्या हिताच्या लोकांनाच पक्षात स्थान देत असल्याचा आरोप
अकोल्यात बाजोरिया विरुद्ध दोन जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप, महानगराध्यक्ष, अश्विन नवलेंसह युवासेना जिल्हाप्रमुख आणि इतर पदाधिकारी असा वाद आहे. हा पक्षांतर्गत वाद आता शिंदे गटातील नेत्यांच्या घरापर्यंत पोहोचला आहे. बुधवारी (1 मार्च) रात्री शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप यांच्या गोरक्षण मार्गावरील सहकारनगर भागातल्या घरी तोडफोड झालीय. यात सरप यांना धक्काबुक्की झाली. सरप यांच्या तक्रारीनंतर शहरातील खदान पोलिसांत बाजोरिया समर्थक असलेल्या उपजिल्हाप्रमुख योगेश बुंदेलेंसह पाच जणांवर गुन्हे दाखल झाले आहे. आपल्या घरावरील हल्ल्यामागे माजी आमदार गोपीकिशन बाजोरियाच असल्याचा गंभीर आरोप जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप यांनी केला आहे.
सरप आणि बाजोरिया यांच्यातील वाद
बाळापूर मतदारसंघातील 'शिवसंग्राम'चे नेते संदीप पाटील यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे वाद सुरु झाला. जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप हे बाळापूर मतदारसंघातील आहेत. त्यांना शह देण्यासाठीच बाजोरियांनी याच मतदारसंघातील संदीप पाटील यांना पक्षात आणल्याचं शल्य विठ्ठल सरप आणि समर्थकांना होतं. त्यातच ठाकरे गटातील जिल्ह्यातील एक बडा नेता सरप गटाच्या पुढाकारातून शिंदे गटात येणार होता. मात्र, तो नेता बाजोरियांचा कट्टर विरोधक असल्याने बाजोरियांनी तो प्रवेश दिला नसल्याचा विरोधी गटाचा आरोप आहे. यातच दोन्ही जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप आणि अश्विन नवलेंची जिल्हा नियोजन मंडळावरील पालकमंत्र्यांकडून झालेली निवड बाजोरियांनीच रोखून धरल्याचा आरोप बाजोरियाविरोधी गटाने केला होता.
संबंधित बातमी