Akola : ...अन् मोराच्या मृत्यूच्या दु:खात गाव जेवलं नाही, अकोल्यातील अंत्री गावातील घटना
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील अंत्री गावकऱ्यांच्या लाडक्या मोराचा वीजेच्या धक्क्यानं मृत्यू झाला. त्यानंतर सगळ्या गावावर शोककळा पसरली.
अकोला : 'तो' रोज त्यांच्या अंगणात यायचा... 'तो' त्यांनी दिलेले दाणेही आनंदाने टिपायचा. 'तो' कोंबड्यांसोबतही खेळायचा... 'तो' येणार म्हणून रडणाऱ्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आपुसकच हसू फुलायचं... त्यानं गेल्या पाच वर्षांपासून अख्ख्या अंत्री गावाचं भावविश्वच पार व्यापून टाकलं होतं. मात्र, काल बुधवारी अचानक 'तो' त्यांच्यातून अचानक कायमचा निघून गेला. त्याला फक्त निमित्तं ठरलं त्याचं उच्च प्रवाहाच्या विद्युत तारांवर बसणं. मात्र, त्याच्या अचानक जाण्यानं गावाचं भावविश्व अक्षरश: नेस्तनाबूत झालं, विस्कटून गेलं. त्याच्या मृत्यूच्या दु:खानं बुधवारी अख्ख्या अंत्री गावात चूल पेटली नाही. लहान मुलं तर आपल्या लाडक्या 'रामू' मोराच्या आठवणींनी हमसुन हमसून रडत होती.
अंत्री गावात गेल्या पाच वर्षांपूर्वी गावात 'रामू' नावाचा एक मोर आला. आधी काही दिवस गावकऱ्यांना त्याच्या येण्याचं अप्रूप आणि आश्चर्यही वाटलं. मात्र, जसेजसे दिवस जात होते, तसेतसे तोही गावकऱ्यांत पार मिसळत गेला. पुढे तर तो त्या गावाचा एक घटकच झाला. कोंबड्याच्या आरवण्याबरोबरच 'रामू'च्या 'म्याँव-म्याँव'नं अंत्री गावाची पहाट उजाडायची. गावातील प्रत्येक अंगण त्याच्या उपस्थितीच्या पाऊलखुणांनी गेल्या पाच वर्षांत हरकून गेलेलं. कारण, तो दिवसभर रानात जायचा. मात्र, संध्याकाळी गावात परत यायचा. बुधवारी 'रामू' असाच गावात भटकत होता. मात्र, बुधवारचा दिवसच जणू त्याच्यासाठी काळ बनून आला होता. 'रामू'काल गावातील एका तारावर बसला. मात्र, दुर्दैवानं ती तार अतिउच्च दाबाच्या विद्युत प्रवाहाची होती. रामूला जोरदार झटका बसला. तो खाली कोसळला अन् जागेवर गतप्राण झाला. ही घटना इतकी अचानक झाली की, अनेकांना काही सुचतच नव्हतं. हे दृष्य पाहून भेदरलेली चिमुकली मुलं रडायला लागलीत. एरव्ही गावात स्वच्छंदपणे खेळणाऱ्या, बागडणाऱ्या 'रामू'चा निष्प्राण देह पाहून सर्व गावातच सुतकी वातावरण होतं. बुधवारी अंत्री गावातील एकाही घरात या दु:खामुळे चुल पेटली नाही. 'रामू'च्या निधनाच्या दु:खानं अख्ख्या गावानं जणू 'उपवास'च केला.
त्याच्या आठवणींची मोरपीसं गावकऱ्यांनी मनात ठेवलीत जपून
'रामू' पिसारा फारच सुंदर फुलवायचा. त्याचा पिसाराही फार मोठा होता. पिसारा फुलवलेल्या 'रामू'चं सौंदर्य अंत्रीच्या गावकऱ्यांनी अक्षरश: मनात कायमचं साठवलं होतं. गावातल्या कोणत्याच व्यक्तीनं ना कधी त्याच्या पिसाऱ्याला हात लावला. ना कधी त्याच्या 'पिसां'ना... अनेकजण त्याच्यासोबत फोटोही काढायचे. मात्र, कधीच कुणी त्याच्या मोरपिसांना धक्काही लावला नाही. त्यामुळे 'रामू'च्या निधनानंतरही गावकऱ्यांनी त्याला त्याच्या पिसांसह शेवटचा निरोप द्यायचा निर्णय घेतला. कारण, त्याच्या आठवणींचं 'मोरपीस'च कायमचं हृदयात जपून ठेवण्याचं गावकऱ्यांनी ठरवलं होतं. बुधवारच्या रात्री अंत्रीच्या गावकऱ्यांनी डबडबलेल्या डोळ्यांनी 'रामू'ला शेवटचा निरोप दिला.
वनविभागानं केलेत 'रामू'वर अंत्यसंस्कार
'रामू'च्या या अपघाती मृत्यूची सुचना गावकऱ्यांनी वनविभागाला दिली. यानंतर वनविभागाचे क्षेत्र वनाधिकारी राजेंद्रसिंह ओवे, मानद वन्यजिव रक्षक बाळ काळणे, वनपाल गजानन इंगळे, वनरक्षक मोरे, गजानन म्हातारमारे, नाथ महाराज , यशपाल इंगोले यांनी घटनास्थळी जावून सर्व सोपस्कार पार पाडलेत. 'रामू'च्या मृत्यूनं मानव आणि वन्यजीवांमधील एका अनोख्या मैत्रीच्या अध्यायाचा शेवट झाल्याची भावना यावेळी वनविभाग, वन्यजीव कार्यकर्ते आणि गावकऱ्यांमध्ये होती.