(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Akola News : अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात बिबट्याचा मुक्त संचार; वन विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
Akola News : विशेष म्हणजे बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये भितीचं वातावरण आहे. स्थानिक नागरिकांकडून वनविभागावर आरोप केला जात आहे.
अकोला : अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात काही भागात बिबट्याचा मुक्तसंचार सुरु असल्याने थरकाप उडाला आहे. अकोट हिवरखेड रस्त्यावरील बंद पडलेल्या सूतगिरणीमागे आठवड्याभरापासून बिबट्याने मुक्काम ठोकला आहे. शुक्रवारी पहाटे अकोला मार्गावरील गोकुळ कॉलनी परिसरात बिबट्या दिसून आल्याची चर्चा होती. दोन्ही ठिकाणी बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे समजते.
अकोटच्या बंद पडलेल्या सुतगिरणीत बिबट्याचा मुक्काम
विशेष म्हणजे बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये भितीचं वातावरण आहे. स्थानिक नागरिकांकडून वनविभागावर आरोप केला जात आहे. दरम्यान अकोटच्या बंद पडलेल्या सुतगिरणीत बिबट्याचा मुक्काम मशीन हॉलमध्ये आहे. शुक्रवारी सायंकाळी हा बिबट्या पुन्हा दिसून आला. त्यानंतर गोकुळ काँलनीमधील एका निवासस्थानी CCTV कॅमेऱ्यात बिबट्या ऐटीत चालताना कैद झाला. याठिकाणी कुत्रे भुंकत असल्याचे दिसते, पण तो बिबट्याच आहे का? यामध्ये शंका उपस्थित होते.
दरम्यान, वन विभागाचे कर्मचारी काही दिवसांपूर्वी त्या सुतगिरणीत पाहणी करुन गेले. पंरतु कुठल्याही विभाग उपाययोजना करीत नसल्याने याठिकाणी सुतगिरणी ताबाधारकाने स्वतः सीसीटीव्ही तैनात केले आहेत. त्यामुळे सांयकाळी हा बिबट्या मशीन हाॅलमधून निघून बाहेर उड्या मारताना दिसून आला. दोन्ही ठिकाणी आढळलेला बिबट्या हा वेगवेगळा असल्याचा अंदाज कॅमेऱ्यामधील अँगलने लावण्यात येत आहे.
हिवरखेड व अकोला मार्गाचे सुध्दा बरेच अंतर आहे. त्यामुळे दोन बिबट्या असल्याची शंका वर्तवली जात आहे. दरम्यान याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली खहे. मात्र, अद्यापही उपाययोजना करताना वन विभाग गंभीर दिसत नाही. त्यामुळे शहरात वस्तीमध्ये बिबट्याचा मुक्तसंचार बघता भितीचे वातावरण नागरिकांमध्ये आहे.
इतर महत्वाच्या बातम्या