(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Akola : अकोल्यात लोहमार्गाने कुरियरद्वारे आलेली 100 किलो चांदी आणि दोन किलो सोनं जप्त
मुंबई हावडा मेल'मधून 'आंगडिया कुरीअर सर्व्हिस'ने आले होतं सोनं-चांदी लोहमार्ग पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू.
अकोला : अकोला लोहमार्ग पोलिसांनी आज अकोला रेल्वे स्थानकावर मुंबई हावडा मेलमधून आलेलं कोट्यावधी रुपयांचे सोने आणि चांदी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. यामध्ये तब्बल दोन किलो सोनं आणि सुमारे 100 किलो चांदी आहे. आंगडिया कुरीअर सर्व्हिस'ने हे सोने-चांदी अकोल्यात आलं आहे. आता हे सोनं-चांदी कुणाचं आहे? या संदर्भात पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील सराफा व्यावसायिक रेल्वे पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून सोने-चांदीच्या संदर्भातील कागदपत्रे आणि पावत्या पोलिसांकडे सादर करण्यात आल्या आहेत.
कसं आलं नेमकं प्रकरण उघडकीस?
अकोला लोहमार्ग पोलिसांनी आज अकोला रेल्वे स्थानकावर 'मुंबई हावडा मेल' या रेल्वेनं प्रवास करणाऱ्या शुभम नामक तरुणाजवळ जड बॅग दिसली. यादरम्यान रेल्वेत गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्याला विचारणा केली. मात्र त्याने बॅगच्या तपासणीसाठी नकार दिल्यानं पोलिसांना त्याच्यावर संशय आला. यानंतर त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं. यावेळी त्याच्या बॅगची झडती घेतली असता पोलीस पार चक्रावून गेलेत. पोलिसांना यामध्ये मोठ्या प्रमाणात सोने आणि चांदी आढळून आली. पोलिसांनी यासंदर्भात त्याला अधिक विचारणा केली असता त्याने आपण आंगडिया कुरीअर सर्व्हिस'चं काम करीत असल्याचं सांगितलं. हे सोन्या-चांदीचं पार्सल अकोल्यातील सराफा व्यापाऱ्यांचं असल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं. यानंतर पोलिस त्याला आरपीएफ ठाण्यात घेऊन गेले. याची माहिती आंगडिया कुरीअर सर्व्हिस'च्या अधिकाऱ्यांना देताच त्यांनी पोलिस ठाणे गाठले. यानंतर अकोला शहरासह जिल्ह्यातील सराफा व्यावसायिक रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल होण्यास सुरूवात झाली.
सोने-चांदीच्या मालकांचा पोलिसांकडून शोध सुरू
पोलिसांनी सोने आणि चांदी यांची तपासणी केली असता सोन्याचं वजन सुमारे दोन किलो भरले. तर चांदीचं वजन 100 किलो असं भरलं आहे. यातील सोनं हे 'लगडी' म्हणजे तारांच्या स्वरूपात आहे. तर चांदी ही बिस्किटाच्या स्वरूपात आहे. सध्या पोलिसांनी यासंदर्भात चौकशी सुरू केली आहे. यावेळी पोलिसांनी जीएसटी विभागासह इतर विभागांना माहिती दिली आहे. पोलिस आणि सबंधित विभाग हे सराफा व्यवसायिकाकडून सोने- चांदीच्या बिलाच्या कागदपत्रांची तपासणी करीत आहेत. तरीही नेमकं अद्याप पूर्ण सोन अन् चांदी कुणाची?, याची माहिती मिळू शकली नाही. कारण काही सोन्या-चांदीच्या कागदपत्रांची पूर्तता झाली असली तरीही इतर सोनं-चांदीची कागदपत्र तपासणी सुरु आहे. या मालाच्या संपूर्ण कागदपत्राची तपासणी म्हणजेचं सर्व गोष्टी निष्पन्न झाल्यास ते परत केल्या जाईल. मात्र यासंदर्भात सध्या पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही. फक्त चौकशीसाठी हे सोनं ताब्यात घेण्यात आलं आहे. या कारवाईमुळे अकोल्यातील सराफा बाजारात मोठी खळबळ उडाली आहे.