"सॉरी, आई! बाय-बाय"...अकोल्यातील तरुणाची आत्महत्या, मराठा आरक्षणासाठी टोकाचे पाऊल उचलल्याचा कुटुंबियांचा दावा
मनोज जरांगे पाटील यांनी 24 डिंसेबरपर्यंतचा वेळ सरकारला दिला आहे. मात्र, त्यानंतरही राज्यभरात काही मराठा तरूणांनी आत्महत्या केल्याने सर्वत्र चिंता व्यक्त होत आहे
अकोला : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न ऐरणीवर आला आहे. मनोज पाटील जरांगेंनी (Manoj Jarange Patil) सुरु केलेल्या उपोषणानंतर मराठा समाजातील 25 पेक्षा अधिक लोकांनी आरक्षणाच्या मागणीवरून आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला होता. दुसऱ्या टप्प्यातलं उपोषण मागे घेत मनोज जरांगे पाटील यांनी 24 डिंसेबरपर्यंतचा वेळ सरकारला दिला आहे. मात्र, त्यानंतरही राज्यभरात काही मराठा तरूणांनी आत्महत्या केल्याने सर्वत्र चिंता व्यक्त होत आहे. याच विषयावर अकोल्यातील एका 19 वर्षीय तरुणानं मराठा आरक्षणासाठी आपलं जीवन संपवल्याचा दावा त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. अभय गजानन कोल्हे असं आत्महत्या करणाऱ्या 19 वर्षीय तरुणाचं नाव आहे. 2 नोव्हेंबरच्या रात्री अभयनं पुण्यातील चाकण भागात आत्महत्या केली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी नुकतीच कोल्हे कुटुंबियांची भेट घेत मृत अभय कोल्हे याच्या बहिणीचं शैक्षणिक पालकत्व स्वीकारलं आहे.
...अन् अभयच्या आत्महत्येनं कोल्हे कुटुंबीय वाऱ्यावर..
अभय गजानन कोल्हे हा मूळ अकोला शहरातील डाबकी रोड भागातील रहिवासी आहे. त्याच्या वडिलांचं कोरोनात निधन झालेले. त्यात घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची. आई आजारी, बहिणीच्या शिक्षणाची चिंता. त्यात आरक्षण मिळत नसल्याची खंत त्याला सतावत. शिक्षण आणि कुटुंबाची जबाबदारी एकट्यावर आली होती. या विवंचनेत असलेल्या अभयनं पुणे येथील चाकण भागात 2 नोव्हेंबर रोजी रात्री साडेसात वाजताच्या सुमारास आत्महत्या केली. वडिलांच्या निधनानंतर आई अर्चना कोल्हे या किराणा दुकानात काम करूनं कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होत्या. मागील वर्षी आयटीआयचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभय पुण्यात इंटर्नशिपसाठी गेला. इथे त्याला दरमहा 12 ते 13 हजार रुपये महिना मिळू लागला. त्यातील तो घरी चार ते पाच हजार रुपये पाठवायचा. अशाप्रकारे कोल्हे कुटुंबीयांचा उदयनिर्वाह सुरू होता. परंतु त्यातून त्याच्या पुढच्या शिक्षणाचं स्वप्न पूर्ण होऊ शकत नव्हतं.
आईकडे व्यक्त केली होती संघर्षाची सल
अभय आपल्या आईशी फोनवर बोलतांना नेहमी मनातल्या व्यथा मांडायचा. दहावीनंतर आयटीआयमध्ये 'डिझेल मेकॅनिकल' हा ट्रेड घ्यायची खूप इच्छा होती. पण आरक्षणाअभावी आपल्याला तो ट्रेड मिळला नाहीये, पुढं भलत्याच् ट्रेडमध्ये नंबर लागला अन् त्यामुळे नाईलाजानं शिक्षण पूर्ण करावा लागलं. कुटुंबाचा गाडा चालवणं आणि शिक्षण घेणं कठीण होतंय. असं वाटत होतं आयटीआयमध्ये जर इच्छेनुसार ट्रेड मिळाला असता आज कुठेतरी चांगली नोकरी मिळाली असती, पण आरक्षणाअभावी नोकरी लागणही कठीण आहे. अशा व्यथा अभय नेहमी मांडत असायचा, असं त्याच्या आईनं म्हटलं आहे.
"सॉरी, आई!, बाय-बाय"...
अभय चाकणमध्ये चार मित्रांबरोबर रूम करून राहायचा. 2 नोव्हेंबरच्या संध्याकाळी 7 वाजता सुमारास चौघांपैकी दोघे मित्र कामावर गेले होते. तर अभय अन् एक मित्र रूमवरचं होता. पण सोबततीला असलेला मित्र नास्ता करण्यासाठी गेला असता तेवढ्यात अभयनं आत्महत्या केली आहे. तळेगाव परिसरात राहणारे त्याचे मामा कैलास गवळी यांना अभयच्या आत्महत्याची बातमी समजताच ते घटनास्थळी दाखल झाले आणि रात्रीच वैद्यकीय तपासणीनंतर अंत्यविधीसाठी अकोल्यात आणण्यात आलं. यादरम्यान अभयकडं छोटीशी सुसाईड नोट आढळून आली, त्यामध्ये नमूद होतं की, "सॉरी, आई... मी चांगला मुलगा नाही बनू शकलो. आता तुला मी काही पागल करत नाही, बाय बाय". अशा प्रकारची चिठ्ठी लिहून त्याने आपलं जीवन संपवलं.
'सकल मराठा समाजा'ने केली कुटुंबाला आर्थिक मदतीची मागणी
अभयची आई अर्चना कोल्हे यांनी जुने शहर पोलिसांना दिलेल्या पत्रात नमूद करून म्हटल आहे की शासनानं कुटूंबाला आर्थिक मदत करावी. हे पत्र दिल्याची माहितीही ठाणेदार किशोर जुनघरे यांनी दिली. या पत्रावर डॉ. अभय पाटील, कृष्णा अंधारे, मुरलीधर राऊत, माधव घोगरे, संकेत मोरखडे, राम गव्हाणकर, बाळू देशमुख, पंकज साबळे आदींची स्वाक्षरी आहेत.
आमदार अमोल मिटकरींनी घेतलं अभयच्या निराधार बहिणीचं शैक्षणिक पालकत्व
या घटनेनंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरींनी नुकतीच कोल्हे कुटुंबियांची त्यांच्या घरी भेट घेतली. यावेळी आमदार मिटकरी यांनी मृतक अभय कोल्हे याची बहिण पूनमचं शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे. लग्न होईपर्यंत पूनमचा सर्व शिक्षणाचा बोजा आमदार मिटकरींनी आपल्या खांद्यावर घेतला आहे. आरक्षणासाठी कुणीही आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नका, आत्महत्या हा पर्याय नाही, असं आवाहन आमदार मिटकरींनी मराठा समाजातील तरुणांना केलं आहे. आमदार अमोल मिटकरी यांच्या या सामाजिक भानाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.