Akola : सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराजांचं दिवंगत पत्नीस भावनिक पत्र
Akola News : सत्यपाल महाराज गेल्या साडेचार दशकांपासून आपल्या सात खंजेऱ्यांतून महाराष्ट्राची वैचारीक 'मशागत' करीत आहेत.
Akola News : सत्यपाल महाराज... संपूर्ण महाराष्ट्रात हे नाव न ऐकलेला माणुस विरळाच असेल. सत्यपाल महाराज गेल्या साडेचार दशकांपासून आपल्या सात खंजेऱ्यांतून महाराष्ट्राची वैचारीक 'मशागत' करीत आहेत. महाराष्ट्राभर छत्रपती शिवाजी महाराज, तुकाराम महाराज, शाहू-फूले-आंबेडकर, तुकडोजी महाराज, गाडगेबाबांच्या विचारांची पेरणी करीत सत्यपाल महाराजांनी हे सर्व महापुरूष महाराष्ट्राला नव्यानं सांगितले आहेत. या सर्व महापुरूषांचा वैचारीक, कृतीशील 'वारसदार' म्हणजे सत्यपाल महाराज...
सात वर्षांपुर्वी त्यांच्या पत्नी सुनंदा यांचं दु:खद निधन झालं. आपल्या सात खंजिऱ्यांतून प्रबोधनाचा वारसा चालविणाऱ्या या माणसाची सावली म्हणजे त्यांची पत्नी. त्यांच्याच समर्थ साथीमूळे सत्यपाल'चा प्रवास 'प्रबोधन करणारा किर्तनकार' ही समर्थ ओळख उभ्या महाराष्ट्राला झाली. पत्नीचं निधन झाल्यावर सत्यपाल महाराजांनी कोणतंही कर्मकांड न करता त्यांचं देहदान केलं होतं. आज आपल्या पत्नीच्या आठवणींना शब्दांत मांडतांना या किर्तनकारांतील संवेदना नव्यानं समोर आल्यात.
...अन ओथंबलेल्या भावना शब्द होऊन पत्रांत उमटतात तेंव्हा...
सत्यपाल महाराजांनी काय लिहिलंय या पत्रात आपल्या 'निसर्गवासी' पत्नीस पाहूयात...
प्रिय पत्नीस!,
आज तुझा जन्म दिवस आहे. लग्नानंतर माझी तू 34 वर्षे सेवा केली .आज तुला निघून जाण्याला सात वर्षे झाली . मी कधी रागावलो तरी तू कधी माझा राग केला नाहीस. पत्नीची उणीव अशी असते मला स्वतःला सतत जाणीव झाली. कधी तुझ्याशी वाद झाला, तुझे चुकले नसतांना मी उगीच रागावलो, तरी तू मला समजावून घेतले. मला पूर्ण कुटुंब सांभाळायचे होते. भाऊ, बहीण, चुलत भाऊ, मायबाप अवघे सांभाळ करण्याकरता तुझ्यावर राग काढत होतो. तुझे चुकले नसताना तुझ्यावर चुका टाकत होतो. कारण, तू माझी होती हे सर्व मी समजत होतो. तरी तुला दुखवत होतो यासाठी आज हृदयातून माफी मागतो.
'मी घरी आलो पाहिजे म्हणून तू 'सौ'चा वाढदिवस असे दरवर्षी 19 सप्टेंबर ला माझ्या डायरीमध्ये लिहून ठेवत होती. आज सहज तुझ्या जन्माच्या आठवणीने अकोल-दर्यापूर प्रवासादरम्यान एसटीमध्ये जात असतांना लिहीत आहे. मी गणोरी येथे तुझ्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेतला. मोठे भाऊ आजारी आहे, त्यांची तब्येत चांगली होऊ दे, तुझ्याविषयी कितीही लिहिले तरी कमीच आहे. तु देहदान करून अजरामर झालीस.तू गेल्यानंतर आम्ही कुठलंच कर्मकांड केले नाही. तू जीवनभर माझ्या सांगितल्याप्रमाणे प्रबोधनाच्या वाटेने जगलीस. वडाच्याभोवती फेऱ्यासुद्धा मारल्या नाहीस. मुलाला डॉक्टर केलेस. डॉ.धर्मपाल दर मंगळवारी शंभर मुलं विनामूल्य तपासतो. कधी-कधी गरिबांना मदतही करतो. तू भाग्यवान आहेस. तुझी मुलगी सरलाबाई दयाळू मायाळू आहे. तू गेल्यावर माझ्यावर सर्वांचे प्रेम आहे. विशेष जनता जनार्दनाचे प्रेम खूप आहे. नाहीतर तुझ्या मागे मी आलो असतो.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात
' आपण आपल्यासाठी नसू|
जगू मरू समूहासाठी ||
समूहाचे कल्याण जिथे |
येथे वाचा मौन बरी||
तुकडोजी महाराज, गाडगे बाबा मला वाचवतात. ठीक आहे. नंदाबाई, जय गुरु!...
तुझाच,
सत्यपाल.
19 सप्टेंबर 2022