Crime : अकोला जिल्हा परिषद उपाध्यक्षांचा रेल्वेत गोंधळ, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Crime : अमरावती एक्सप्रेसमध्ये अकोला जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष सुनिल फाटकर यांनी प्रचंड गोंधळ घातला.
Crime News : अमरावती एक्सप्रेसमध्ये अकोला जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष सुनिल फाटकर यांनी काल रात्री प्रचंड गोंधळ घातला. यावेळी फाटकर यांनी मद्यप्राशन केलेले असल्याचंही बोललं जातेय. त्यांचा धिंगाणा बघून रेल्वेत असलेल्या इतर प्रवाशांनी त्यांची तक्रार रेल्वे तिकीट तपासनिकांकडे केली. त्यानंतर रेल्वे पोलीस हजर झाले. फाटकरांना नाशिकच्या रेल्वे रोड लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांच्यावर लोकप्रतिनिधी असल्यामुळे 110 व 117 नुसार कारवाई करून समजपत्र देत सोडून देण्यात आले. दरम्यान सुनील फाटकर हे वंचित बहुजन आघाडीचे शिर्ला सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य असून अकोला जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, काल मुंबईतील सीएसटी स्टेशनवरून अमरावती एक्सप्रेस रवाना झाली. या रेल्वेतील बोगी क्रमांक 'बी - 1'मध्ये 48 क्रमांकाची सीट फाटकरांची होती. या प्रवासादरम्यान त्यांनी रेल्वेत मद्यप्राशन करून प्रचंड गोंधळ घातला. रेल्वेत हजर असलेले इतर प्रवासी त्यांच्या गोंधळाला चांगलेच वैतागले होते. प्रवाशांनी वैतागून त्यांची तक्रार रेल्वेतील तिकीट तपासनिकांकडे केली. रेल्वे तिकीट तपासनिकांनी त्यांची समजूतही काढली. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर रेल्वे प्रशासनाने नाशिकरोड रेल्वे पोलिसांना या संदर्भात माहिती दिली. नाशिकरोड पोलिसांनी फाटकरांना रेल्वेतून ताब्यात घेतलं. रात्री 12 वाजताच्या सुमारास रेल्वे नाशिक रेल्वे स्टेशनवर दाखल झाली. त्यानंतर नाशिक रोड लोहमार्ग पोलिसांनी फाटकर यांच्यासह अन्य एका व्यक्तीवर 110 आणि 117 प्रमाणे कारवाई ( सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे तसेच असभ्य वर्तन करणे) करत त्यांना समजपत्र देवून सोडून दिले. थोड्या वेळानंतर फाटकर हे दुसऱ्या रेल्वेने अकोल्यात दाखल झाले.
आपल्या बदनामीचे षडयंत्र : सुनिल फाटकर
सुनील फाटकर यांनी कारवाई झाल्याचं मान्य केलं आहे. मात्र, आपण मद्यप्राशन केलं असल्याचं त्यांनी खंडण केलं. त्यांनी आपल्याला हे बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप केला. यावेळी त्यांनी हा घटनाक्रम सांगतांना म्हटलं की, काल मुंबईवरून अमरावती एक्सप्रेसमध्ये बसलो, यावेळी रेल्वेच्या बोगीत एका आमदारांचे समर्थक होते, त्यांनी माझ्याशी किरकोळ कारणांवरून वाद घातला. यावेळी माझ्यासोबत माझा मित्रही होता. अन् त्या आमदाराचे समर्थक खूप सारे होते. त्यामुळ रेल्वे तिकीट तपासनीकांनी मध्यस्थी करून आपल्याला नाशिक रेल्वे स्टेशन इथे उतरायला सांगितलं. कारण समोरील लोक खूप सारे आहेत. वाद होऊ शकतोय हा वाद होऊ नये म्हणून आपण दुसऱ्या रेल्वेने पुढचा प्रवास करावा, अशी विनंती रेल्वे तिकीट तपासनिकांनी केली होती. त्या विनंतीला मान देत पुढचा प्रवास दुसऱ्या रेल्वेने केला अन् आज अकोल्याला परतलो. पुढे बोलतांना म्हणाले की मला नेहमी विरोधकांचं बदनाम करायचं षडयंत्र असतं. या घटनेला दिलेलं दुसरं वळणही याचाच भाग असल्याचे फाटकर म्हणालेत.