(Source: Poll of Polls)
सरकारकडे शक्तिपीठ महामार्गासाठी पैसे, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नाहीत; सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल
Supriya Sule on Mahayuti Goverment: सुळे यांनी सरकारला थेट इशारा दिला. “मी या सरकारमध्ये नसणे, हेच माझं भाग्य आहे. जोपर्यंत सरसकट कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत आम्ही सरकारला स्वास्थ बसू देणार नाही.”

Supriya Sule on Mahayuti Goverment: शेतकऱ्यांना मदत न करता केवळ पाहणी दौरे करणाऱ्या सरकारवर खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार टीका केली. “शक्तिपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत, पण शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी पैसा नाही, ही महाराष्ट्रातील लाजिरवाणी परिस्थिती आहे,” असा घणाघात सुळे यांनी केला. त्या संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुले येथे लाडुजी सतुजी घुले यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलत होत्या.
कांद्याला भाव नाही, दिवाळी गोड नाही
सुळे म्हणाल्या, “आज कांद्याला भाव नाही, एखादंही पीक फायदेशीर नाही. पवारसाहेब मंत्री असताना भाव पडू दिला नाही, पण या सरकारच्या काळात एकाही पिकाला भाव नाही. सरकार म्हणतं ‘दिवाळी गोड करू’, पण कोणाची झाली? तुमची असेल, कारण तुम्हाला शक्तिपीठ महामार्ग करायचा आहे.”
विखे पाटलांवर अप्रत्यक्ष निशाणा
सुळे म्हणाल्या, “अहिल्यानगर जिल्ह्यात काही जणांचं आमच्यावर फार प्रेम आहे,” असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टोलाही लगावला. “काही लोक फक्त बोलत राहतात, पण आम्ही साईबाबांचा ‘श्रद्धा आणि सबुरी’चा मंत्र जोपासला आहे. वेळ येईल, फक्त सबुरी ठेवा,” असंही त्यांनी सांगितलं.
सरकार पाहणी करते, पण काम नाही
“सरकारचे मंत्री फक्त पाहणीसाठी फिरतात. जलजीवन मिशनची कामं अपूर्ण आहेत, अनेक ठिकाणी पाइपलाइन फुटल्या आहेत. आम्ही केंद्राकडे तक्रार करून चौकशी लावली आहे. सत्ता मिरवण्यासाठी नव्हे, तर जनतेच्या आयुष्यात बदल करण्यासाठी असते,” असा टोला त्यांनी लगावला.
कर्जमाफी न झाल्यास सरकारला स्वस्थ बसू देणार नाही
सुळे यांनी सरकारला थेट इशारा दिला. “मी या सरकारमध्ये नसणे, हेच माझं भाग्य आहे. जोपर्यंत सरसकट कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत आम्ही सरकारला स्वास्थ बसू देणार नाही.” असे त्या म्हणाल्या. भाषणादरम्यान सुळे यांनी दिवंगत आर.आर. पाटील यांच्या आठवणी जागवल्या आणि महिलांना सत्तेत स्थान देऊन खरा सन्मान कसा केला हे सांगितलं. तसेच, संग्राम जगताप यांच्या भडकाऊ वक्तव्याचा उल्लेख करत त्यांनी इशारा दिला. “माझ्या मतदारसंघात येऊन कोणी अशी विषारी भाषा वापरली, तर येऊ देणार नाही. टाटा, लस, औषधं सगळं चालतं, मग समाजावर टीका का? असं भाषण सहन होणार नाही.”
जनतेच्या सुखदुःखात असणाऱ्यांनाच मत द्या
सुळे म्हणाल्या, “जो तुमच्या सुख-दुःखात असतो, त्यालाच मत द्या. आम्ही शेतीमध्ये अमेरिकेला येऊ दिलं नाही, आणि या सरकारने तसं काही केलं, तर आम्ही विरोध करू. शेतीतील कोणत्याही निर्णयात परदेशी हस्तक्षेप सहन केला जाणार नाही.”
29 मध्ये जनता घरात बसवेल
“राज्यात अनेक प्रश्न आहेत, पण काही नेते फक्त तेढ निर्माण करण्याचं काम करतात. 2029 मध्ये जनता अशा लोकांना घरात बसवेल,” असा थेट इशारा सुळे यांनी दिला.
इतर महत्वाच्या बातम्या



















