Sujay Vikhe Patil : यांनी राज्यातल्या जनतेला तीन वर्षे रडवलं, आता निकालानंतर डोळे पाणावल्याने सहानुभूती मिळणार नाही; सुजय विखेंचा आदित्य ठाकरेंना टोला
Shiv Sena MLA Disqualification Verdict: देशाच्या इतिहासात एवढा सविस्तर निकाल पहिल्यांदाच दिला गेला असावा असं म्हणत भाजप खासदार सुजय विखे यांनी या निकालाचे स्वागत केलं.
अहमदनगर: ज्या लोकांनी तीन वर्षे राज्यातल्या जनतेचे डोळे पाणावले, त्यांना रडवलं, त्यांचे डोळे आजच्या निकालाने पाणावले असतील तर त्यांना सहानुभूती मिळणार नाही असं म्हणत भाजपचे खासदार सुजय विखे पाटलांनी (Sujay Vikhe Patil) शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना टोला लगावला. आजचा निकाल पाहिल्यानंतर आमदार आदित्य ठाकरे यांच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. त्यावर सुजय विखे यांनी प्रतिक्रिया दिली.
शिवसेना आमदार अपात्रतेबाबत आज जो निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिला त्याचे मी स्वागत करतो, जवळपास सव्वा तास विधानसभा अध्यक्षांनी निकालाचे वाचन केले आणि त्यातील सर्व बारकावे त्यांनी स्पष्ट केले. देशाच्या इतिहासात एवढा सविस्तर निकाल पहिल्यांदाच दिला गेला असावा असं म्हणत भाजप खासदार सुजय विखे यांनी या निकालाचे स्वागत केलं. या निकालानंतर आता मागील दीड वर्षांपासून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांची मालिका थांबेल असा विश्वासही सुजय विखेंनी व्यक्त केला.
शरद पवारांना टोला
शरद पवार यांनी या निकालावरती प्रतिक्रिया देताना निकाल आधीच ठरला होता, केवळ स्क्रिप्ट वाचली गेली असं म्हटलं. यावर बोलताना खासदार सुजय विखे यांनी शरद पवारांना टोला लगावला. ते म्हणाले की, शरद पवार यांना अगोदर स्क्रिप्ट माहिती झाली होती का हे मला माहिती नाही. आता अनेक लोक असेही म्हणतात की शरद पवार जो विरोधाभास तयार करत आहेत तो देखील स्क्रिप्टेड आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही घडलं ते पवार साहेबांनी घडवून आणलं असं देखील अनेकजण म्हणतात. त्यांच्या आरोप प्रत्यारोपाला काही अर्थ राहत नाही. वास्तविकता जनतेच्या समोर आली आहे आणि त्यांना निकालात काही वाटत असेल तर न्यायालयाचा पर्याय त्यांच्यासमोर आहे.
संजय राऊतांना मॅच फिक्सिंगची सवय
आमदारांच्या अपात्रतेवरच्या निकालावरती प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी हा निकाल म्हणजे मॅच फिक्सिंग असल्याचं म्हटलं होतं. यावर बोलताना सुजय विखे म्हणाले की, संजय राऊत यांनी 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीआधीच शरद पवार यांच्यासोबत मिळून मॅच फिक्सिंग करून घेतली होती. त्यावरून ज्या लोकांना आधीच मॅच फिक्सिंगची सवय लागली आहे, त्यांना ही मॅच फिक्सिंगच वाटेल असा टोला लागला. 2024 मध्ये जनताच ठरवेल की खरी शिवसेना कोणाची आहे.
ठाकरेंना धक्का, शिवसेना शिंदेंचीच
महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या शिंदे गट आणि ठाकरे गटाबाबतचं निकालवाचन आज पार पडलं. एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. त्याचसोबत शिंदे गटाच्या भरत गोगावले यांचा व्हिप अधिकृत ठरवत ठाकरे गटाच्या सुनील प्रभू यांचा व्हिप विधानसभा अध्यक्षांनी अवैध ठरवला. त्यामुळे या निकालात उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून, एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा मिळाला.
ही बातमी वाचा: