Shrirampur : श्रीरामपूर महायुतीत पेच, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या दोघांना एबी फॉर्म, दोघांचाही आपणच अधिकृत असल्याचा दावा
Shrirampur Vidhan Sabha Election : शिवसेना शिंदे गटाने भाऊसाहेब कांबळे यांना तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने लहू कानडे यांना एबी फॉर्म दिला आहे.
अहमदनगर: विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला राज्यात वेग आला असून माघारीनंतर लढतींचे चित्र स्पष्ट झालं आहे. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात मात्र महायुतीचा अधिकृत उमेदवार कोण यावरून मतदार गोंधळलेल्या परिस्थितीत आहेत. महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी अजित पवार गट व शिंदे यांच्या शिवसेना या दोन्ही पक्षांनी दोन अधिकृत उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहे. दोघांनी आपले उमेदवारी अर्ज कायम ठेवत आपणच अधिकृत असल्याचा दावा केल्याने श्रीरामपूर मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाने भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी देत एबी फॉर्म दिला. त्या पाठोपाठ काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केलेल्या विद्यमान आमदार लहू कानडे यांना देखील अजित पवार गटाने उमेदवारी देत एबी फॉर्म दिला. माघारीच्या दिवशी एका उमेदवाराची माघार होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.
दोघांचीही माघार नाही
शिंदे गटाचे भाऊसाहेब कांबळे यांना माघार घ्यावी लागेल असं वक्तव्य देखील विखे पाटील यांनी केलं होतं. मात्र माघारीच्या दिवशी भाऊसाहेब कांबळे हे नॉट रिचेबल झाले ते दिवसभर. आता त्यांच्याशी संपर्क साधला असता मी पक्षाचा अधिकृत उमेदवार असून मला माझ्या वरिष्ठांचा माघारीसाठी कोणताही फोन आला नाही अशी प्रतिक्रिया देत माझा प्रचार मी सुरू केला आहे हे स्पष्ट केलं.
दुसरीकडे काँग्रेसमधून उमेदवारी नाकारल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केलेले विद्यमान आमदार लहू कानडे यांनी देखील मीच महायुतीचा अधिकृत उमेदवार आहे हे सांगितले. माझ्या प्रवेशाच्या दिवशीच मला एबी फॉर्म दिला होता. वरिष्ठ पातळीवर चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती देखील लहू कानडे यांनी दिली. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राष्ट्रीय सचिव यांनी देखील माघारीच्या दिवशी एखाद्या पक्षाचा उमेदवार नॉट रिचेबल होतो यावरून सगळं लक्षात आलं. त्यामुळे पक्ष त्यांच्यावर काय कारवाई करेल याची आम्ही वाट पाहत आहोत असं वक्तव्य केलं.
वरिष्ठ निर्णय घेणार, विखे पाटलांची प्रतिक्रिया
दरम्यान, या सगळ्या गोंधळावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. गैरसमजुतीमुळे भाऊसाहेब कांबळे यांचा अर्ज राहिला आहे असं सांगताना हा सगळा विषय वरिष्ठ पातळीवर गेला असून दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते चर्चा करून महायुतीचा उमेदवार कोण याचा मंगळवार संध्याकाळपर्यंत निर्णय घेतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
दरम्यान, नेवासा मतदारसंघातदेखील अजित पवार गट व शिंदे शिवसेना गट या दोघांनी एबी फॉर्म देत उमेदवार दिले होते. मात्र माघारीच्या अखेरच्या क्षणी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवाराने माघार घेत त्या ठिकाणी महायुतीला समर्थन दिलं. श्रीरामपूर मतदारसंघात मात्र महाविकास आघाडीच्या उमेदवारासमोर महायुतीचेच दोन्ही उमेदवार एकमेकांसमोर उभे राहिल्याने महायुतीचा अधिकृत उमेदवार कोण हे लवकरच स्पष्ट होईल.
ही बातमी वाचा: