Shiv Jayanti 2023 : कौतुकास्पद! गव्हाच्या पिकातून साकारली 'शिवप्रतिमा', अहमदनगरच्या कुणाल विखेंची कलाकृती
Shiv Jayanti 2023 : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील एका युवा शेतकऱ्यानं शिवाजी महाराजांची अनोखी प्रतिमा साकारली आहे.
Shiv Jayanti 2023 : आज संपूर्ण राज्यभर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा (Shiv Jayanti 2023) उत्साह पाहायला मिळत आहे. शिवजयंतीनिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवजयंतीनिमित्त अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील एका युवा शेतकऱ्यानं शिवाजी महाराजांची अनोखी प्रतिमा साकारली आहे. या शेतकऱ्यानं आपल्या शेतामध्ये गहू पीक (wheat crop) उगवून त्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतीकृती साकारली आहे. कुणाल विखे (Kunal Vikhe) असं लोणी गावातील शेतकऱ्याचे नाव आहे.
कुणाल विखे या तरुण शेतकऱ्याने गहू पीक उगवून त्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांची कलाकृथी साकारली आहे. यासाठी कुणाल विखे हे गेल्या 5 दिवसांपासून मेहनत घेत होते. सुरुवातीला शिवरायांची रांगोळी काढून त्यामध्ये त्यांनी गव्हाचे बियाणे टाकले होते. त्यानंतर त्यांनी गहू पिकाला पाणी दिले होते. गहू उगवून येण्यासाठी पाच ते सहा दिवसांचा कालावधी लागला होता. या प्रतीकृतीची लांबी 24 फूट असून रुंदी 18 फूट आहे. यासाठी 10 किलो गव्हाच्या बियाणांचा वापर करण्यात आला आहे. या शेतकऱ्याचा व्हीडिओ आज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
आज छत्रपती शिवाजी महाराजांची 393 वी जयंती साजरी केली जात आहे. महाराष्ट्रातील गावा गावात शहरा-शहरांत शिवजयंतीचा (Shivjayanti) उत्साह पाहायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रासाठी एका उत्सव असतो. या दिवशी समाजाच्या सर्व स्तरांतून शिवभक्त शिवरायांना मानवंदना देण्यात येते. या दिवशी त्यांच्या प्रतिमेची पूजा करतात तर काहीजण सार्वजनिक मिरवणूक काढतात. गावखेड्यांपासून शहरांत शिवजयंतीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो.
आग्रा येथील लाल किल्ल्यावर शिवजयंती साजरी होणार
या वर्षीच्या शिवजयंतीचं वैशिष्ट्य म्हणजे यंदा आग्रा येथील लाल किल्ल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 'दिवाण-ए-आम' सभागृहात शिवजयंती साजरी होणार आहे. या सोहळ्याला आधी पुरातत्त्व खात्याने परवानगी नाकारली होती. मात्र, सामाजिक संस्थांनी या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. राज्य सरकार सहआयोजक असल्यास आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्याची परवानगी मिळेल, असा निर्णय कोर्टाने दिला. त्यानंतर आता शिवजयंतीचा हा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे.
शिवनेरी गडावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती
शिवनेरी गडावर शासकीय जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या: