Raju Shetti : ...तर मुंबईकडे जाणारा दूध पुरवठा रोखणार; राजू शेट्टी आक्रमक, राज्य सरकारवर जोरदार टीका
Ahmednagar News : अहमदनगरमधील राहुरी येथे राजू शेट्टींच्या नेतृत्वात दुधाला किमान 40 रुपये दर मिळावा या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध करण्यात आला.
अहमदनगर : दुधाला किमान 40 रुपये दर मिळावा, यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) व माजी मंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांच्या उपस्थितीत अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी (Rahuri) शहरात भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर पत्रकार परिषदेत राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला गंभीर इशारा दिला आहे. आठ दिवसात अनुदान निर्णय झालं नाही तर मुंबईकडे जाणारा दूध पुरवठा रोखणार, असे त्यांनी म्हटले आहे.
राजू शेट्टी म्हणाले की, सरकार अनेक निर्णय घेते व घोषणा करते. मात्र त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही. दूध भुकटी आयात करण्याचा निर्णय घेण्याची आवश्यकता नव्हती. दुधाचे भाव 12 रुपयांनी खाली आले आहेत. या परिस्थितीत शेतकऱ्यांनी जगायचे कसे? आज २ जुलै असताना अद्याप दूध अनुदानाचा निर्णय घेण्यात आला नाही. दुग्धविकास मंत्र्यांनी कधी बैठक घेतली, याबाबत मला माहीत नाही. बैठकीचे मला निमंत्रण नव्हते आणि जी बैठक झाली ती उभ्या-उभ्या घेण्यात आली असे समजले. एकेकाळी महाराष्ट्राकडे पाहून दुधाचे धोरण ठरत होते. आता दुधाची शिखर संस्थाच दुसऱ्यांना देण्याची वेळ सरकारवर आलीय, असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.
...तर मुंबईकडे जाणारा दूध पुरवठा रोखणार
ते पुढे म्हणाले की, प्रधानमंत्री फसल योजना कॉर्पोरेट आहे, असे वाटते. जितके पैसे विम्यासाठी भरतात. तितकीच मदत शेतकऱ्यांना करायला हवी. एकदा विमा कंपन्यांना किती फायदा झाला याची श्वेतपत्रिका काढा. तर आठ दिवसात अनुदानाचा निर्णय झाला नाही तर मुंबईकडे जाणारा दूध पुरवठा रोखणार, असा इशारा राजू शेट्टी यांनी यावेळी राज्य सरकारला दिला आहे.
राजू शेट्टींची राज्य सरकारवर जोरदार टीका
दरम्यान, रास्ता रोको आंदोलनावेळी राजू शेट्टी म्हणाले की, सरकार कोणाचेही असले तरी आम्हाला भांडावं लागणार आहे. मी अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी संघर्ष करतोय. अनेक सरकारं आली आणि गेली. मात्र संघर्ष अद्याप संपलेला नाही. शेतकरी सरकारकडे जगावेगळे काही मागत नाही. पशुखाद्याच्या किमती वाढल्या, चारा वाढला, मजुरांचीही संख्या कमी झाली. दूध धंदा तोट्यात आहे, अशी शेतकऱ्याची अवस्था झाली. किती वर्ष आमच्या आई-बहिणीने शेणामध्ये हात घालायचे? दूध भुकटी भाव पडले की पाडले? हे मला माहीत नाही. मात्र या कंपन्यांनीच दुधाचा खेळखंडोबा करून ठेवलाय. टक्कल असणाऱ्या माणसाला चांगला कंगवा दिला जातो, अशी अवस्था झाली आहे. अनुदान देताना कुठली अट ठेवू नका. अनुदान थेट शेतकऱ्याच्या नावावर जमा करा. लोकसभेला फटका बसला, विधानसभेला फटका बसायची वाट पाहू नका, अशी टीका त्यांनी यावेळी सरकारवर केली आहे.
आणखी वाचा
'लोकसभेला फटका बसला, विधानसभेला बसायची वाट पाहू नका', राजू शेट्टींचा दूध दरावरून सरकारला इशारा