राजकारण, राजकीय प्रक्रिया आणि माध्यमांवर धनदांडग्यांनी नियंत्रण मिळवलय, पोपटराव पवार यांच्यासह आणखी 2 पद्मश्रींनी व्यक्त केली खंत
Ahmednagar : भारताचे राजकारण , राजकीय प्रक्रिया आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांवर मोजक्या राजश्रीत धनदांडग्यांनी नियंत्रण मिळवले असल्याची खंत पोपटराव पवार , डॉ. श्याम पालीवाल आणि निलिमा मिश्रा या तीन पद्मश्रींनी व्यक्त केली.
Ahmednagar : भारताचे राजकारण , राजकीय प्रक्रिया आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांवर मोजक्या राजश्रीत धनदांडग्यांनी नियंत्रण मिळवले असल्याची खंत पोपटराव पवार , डॉ. श्याम पालीवाल आणि निलिमा मिश्रा या तीन पद्मश्रींनी व्यक्त केली. स्नेहालय संस्थेच्या युवानिर्माण प्रकल्पाने आयोजित केलेल्या युवा संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. देशापुढील वर्तमान आव्हाने आणि तरुणाईची सामूहिक जबाबदारी' ,या विषयावर देशातील तीन नामांकित पद्मश्री पुरस्कार प्राप्त कर्मवीरांनी स्नेहालय संस्थेच्या स्नेहांकुर दत्तक विधान प्रकल्पाच्या प्रांगणात तरुणाईशी संवाद केला.
सत्ता आणि निवडणुका एवढेच सत्ताधारी आणि सत्ताशोधक गटांचे लक्ष्य बनले
या तिघांनी नमूद की, सत्ता आणि निवडणुका एवढेच सत्ताधारी आणि सत्ताशोधक गटांचे लक्ष्य बनले आहे. कर्जबाजारी शेतकरी- कष्टकरी - युवक यांचे प्रश्न,रोजगार , शिक्षण , आरोग्य , पर्यावरण, महिला आणि बालकांसह दुर्बल घटकांचे अधिकार आणि संविधानाची मार्गदर्शक तत्वे यांकडे व्यवहारात कोणाचेही प्रामाणिक लक्ष नाही. अशा स्थितीत अस्वस्थ तरुणाईने एकीकडे रचनात्मक करावेच, पण भावनिक मुद्द्यांवरील राजकारण्यांनी शिजवलेल्या कुठल्याही द्वंद्वात अजिबात गुंतू नये. सर्वपक्षीय शोषकांशी सामूहिक संघर्ष तरुणाईने केला तरच भारत देश स्वातंत्र्याच्या शताब्दी पर्यंत टिकेल,अशी स्पष्टोक्ती पद्मश्री पालीवाल, पवार आणि मिश्रा यांनी केली.
फक्त झाडे लावून जलवायू परिवर्तनासारखा गंभीर प्रश्न हाताळता येणार नाही
राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यात पिपलांत्री हे आदर्श गाव पालीवाल यांनी उभे केले. 2006 साली मुलीच्या आकस्मित निधनानंतर पंचक्रोशीत मुलीचा जन्म झाल्यावर 111 वृक्षांच्या लागवडीची चळवळ पालीवाल यांनी सुरू केली. जल - जंगल आणि जमीन या नैसर्गिक संपदांचे देशात झपाट्याने खासगीकरण होत असल्याने आर्थिक आणि सामाजिक विषमता प्रचंड वाढल्याचे निरीक्षण पालीवाल यांनी नोंदवले. फक्त झाडे लावून जलवायू परिवर्तनासारखा गंभीर प्रश्न हाताळता येणार नसून त्यासाठी शासनाची धोरणे आणि समाजाची मानसिकता युवाशक्तीला प्रभावित करावी लागेल.
पवार म्हणाले की, सध्या देशात नीट आणि अन्य स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार चीड आणत आहेत. आरक्षणावरून समाजात निर्माण झालेली दुही - संघर्ष, संवाद ऐवजी संघर्ष आणि देशावर आधारलेले सत्ताकारण , भ्रष्टाचाऱ्यांना उघडपणे मिळणारा राजाश्रय , मादक पदार्थांची सर्वत्र सर्रास होणारी विक्री आणि उपलब्धता यातून तरुणाईमध्ये ऐतिहासिक अस्वस्थता आहे. ज्वालामुखीच्या तोंडावर भारत देश असल्याची पुरेशी जाणीव राजकारणी - अभ्यासक आणि माध्यम तज्ञातही दिसत नाही. मागील एका शतकात भारताचे नैतिक नेतृत्व महात्मा गांधी - विनोबा - जयप्रकाश नारायण - अण्णा हजारे यांनी केले. सर्व देशाला प्रेरित करणाऱ्या अशा नैतिक नेतृत्वाची परंपरा आता खंडित झाल्याने नाजिक भविष्यातील अराजक कोण रोखणार हा प्रश्न अनुत्तरीत असल्याचे पोपटरावांनी सांगितले.
वंचितांचे संमिश्र अनुभव
वंचितांचे आलेले संमिश्र अनुभव पद्मश्री सोबतच तसेच रॅमन मॅगसेसे पुरस्काराने गौरविलेल्या नीलिमा मिश्रा यांनी सांगितले. नीलिमा यांनी जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात महिला सक्षमीकरणाचे अनोखे प्रयोग केले. सध्या त्या अहमदनगर जिल्ह्यात स्नेहालय संस्थेच्या सहयोगाने ग्रामीण - दुष्काळी भागातील महिलांना गोधड्या - कुर्त्या आणि जाकिटे बनविण्याचे प्रशिक्षण आणि रोजगार देत आहेत.
सेवाकार्यातील आपले काही कटू अनुभव यावेळी नीलिमा ताईंनी सांगितले. कर्ज आणि खाजगी सावकारांचा जाच यामुळे आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान निकेतन या संस्थेने प्रचंड धडपड केली . पुढारी आणि शासनाकडून आश्वासनांशिवाय काहीच मिळाले नाही. कर्जमुक्त केले तर पाच वर्षात पूर्ण कर्जाची फेड करू , असे टेकीला आलेल्या शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे अखेरीस शेवटचा उपाय म्हणून अल्प व्याजदराने स्वतः च्या नावावर आणि जबाबदारीवर व्यावसायिक फायनान्स कंपन्यांचे कर्ज घेऊन त्यांच्या आत्महत्या वाचवल्या. त्यांना व्यावसायिक शेतीचे आणि जोडधंद्यांचे मार्ग दाखवले.
परंतु त्यानंतर पैसे मिळाल्यावर आपल्या कर्जाची फेड करण्याऐवजी लाभार्थीनी गाड्या घेतल्या आणि मोठी घरे बांधली. कर्जाचे आणि मदतीचे पैसे हे बुडवायचेच असतात, अशी मानसिकता समाजाची तयार झाल्याने भीषण आर्थिक संकटात आपली संस्था आणि जामीनदार कार्यकर्ते सापडल्याचे नीलिमा मिश्रा म्हणाल्या. या संकटातून बाहेर पडताना स्नेहालय परीवार आणि नगर जिल्ह्यातील काही जाणीवसंपन्न नागरिकांनी केलेल्या मदतीबद्दलही मिश्रा यांनी सविस्तर सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या
Vidhana Parishad Election Result 2024: पंकजा मुंडे यांचा गेम भाजपच्याच नेत्यांनी केला, आता विधानपरिषदेत पराभव झाल्यास.... भास्कर जाधवांचं वक्तव्य