Anna Hazare : 'या माणसानं देशाचं वाटोळं केलं; जितेंद्र आव्हाडांच्या पोस्टनंतर अण्णा हजारे कोर्टात जाणार
Anna Hazare On Jitendra Awhad : वकिलांचा सल्ला घेणार आणि जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात अब्रु नुकसानीचा दावा दाखल करणार असं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितलं.
अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवकांना आण्णा हजारे (Anna Hazare) आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याविरोधात कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केल्यानंतर त्यावर वकिलांचा सल्ला घेऊन अब्रुनुकसानीचा दावा (Defamation Case) दाखल करणार असल्याचं अण्णा हजारे यांनी सांगितलं आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा फोटो ट्विट करून 'या व्यक्तीमुळे देशाचा वाटोळं झालं, टोपी घातली म्हणजे कुणी गांधी होत नाही' असं म्हटलं होतं. याला प्रत्युत्तर देताना अण्णा हजारे म्हणाले की, माझ्यामुळे देशाचा वाटोळ झालं नाही, तर माझ्या आंदोलनामुळे अनेक देशहिताचे कायदे झाले, मी देशभरात फिरत असताना माहिती अधिकार कायद्याबाबत लोक मला चांगल्या प्रतिक्रिया देतात. मात्र अनेक पक्ष कार्यकर्त्यांचं वाटोळे झालं असल्याचं नाकारता येत नाही.
ह्या माणसानी ह्या देशाचे वाटोळे केले
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) October 5, 2023
टोपी घातली म्हणजे कुणी गांधी होत नाही pic.twitter.com/hDLIsSW8g9
अण्णा हजारेंनी जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात कोर्टात जाणार असल्याचं सांगितल्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
या आधीही अण्णा हजारेंच्यावर राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काही आरोप केले होते. काँग्रेसच्या काळात आंदोलनं करणारे अण्णा हजारे भाजपच्या भ्रष्टाचारावर काही बोलत नाहीत असा आरोप त्यांच्यावर केला जातोय. देशात नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत आल्यापासून भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन करणारे अण्णा हजारे आंदोलनांपासून काहीसे दूर असल्याचं चित्र आहे. नेमक्या याच गोष्टीवर बोट ठेवत भाजपच्या काळात त्यांच्यावर शांत बसल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून केला जातोय.
Sanjay Raut On Anna Hazare : संजय राऊतांची टीका
या आधी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही अण्णा हजारेंच्या मौनावर सातत्याने टीका केल्याचं दिसून आलं. मणिपूरच्या मुद्द्यावर अण्णा हजारे शांत बसल्याने राऊतांनी त्यांच्यावर टीका केली होती. ते म्हणाले की, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत त्यांच्याविरोधात अण्णा हजारे यांनी आपली भूमिका जाहीर करून एका आंदोलनाची घोषणा केली पाहिजे. आम्ही सगळे त्यांच्याबरोबर आहोत. मणिपूर विषयावरती अख्खा देश जागा झाला आहे, पण त्यावर अण्णा हजारे यानी कोणतीही भूमिका घेतली नाही, एक शब्दही बोलले नाहीत. आम्ही वाट बघत होती अण्णा कधी बोलणार. महाराष्ट्रात जो भ्रष्टाचार झालाय, ज्यांनी हा भ्रष्टाचार केलाय ते सगळे ओवाळून टाकलेले भ्रष्टाचारी या सरकारमध्ये आहेत आणि प्रधानमंत्री त्यांचा दिल्लीमध्ये सत्कार करत आहेत.
ही बातमी वाचा: