Ahmednagar Politics : अहमदनगरचे माजी महापौर अभिषेक कळमकर पुन्हा राष्ट्रवादीत, नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता
अहमदनगरचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरद पवार गट) प्रवेश केला आहे. कळमकर यांना पक्षाकडून महत्वाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
Ahmednagar Politics : अहमदनगरचे माजी महापौर (Ahmednagar Former Mayor) अभिषेक कळमकर (Abhishek Kalamkar) यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरद पवार गट) प्रवेश केला आहे. मुंबईत शनिवारी (22 जुलै) शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं (NCP) घड्याळ हाती बांधलं आहे. अभिषेक कळमकर हे मागील तीन वर्ष शिवसेना ठाकरे गटासोबत होते. अभिषेक कळमकर यांच्या शरद पवार राष्ट्रवादी गटातील प्रवेशामुळे नगर शहरात पक्षाला नवचैतन्य मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कळमकर यांना पक्षाकडून महत्वाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर आता शरद पवार गटात स्वतःसाठी जागा निर्माण झाल्याने अनेक जण प्रवेश करत आहेत. अभिषेक कळमकर हे शरद पवार यांचे एकनिष्ठ जुने विश्वासू माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांचे पुतणे आहेत.
संग्राम जगताप अजित पवारांसोबत गेल्याने अभिषेक कळमकर पुन्हा राष्ट्रवादीत
अभिषेक कळमकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला होता. त्यानंतर ते शहराचे महापौरही झाले. मात्र, दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या गटाशी त्यांचे राजकीय गणित न जुळल्याने त्यांनी राष्ट्रवादी पक्षाला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ते ठाकरे गटासोबत राहिले. त्यानंतर राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. याशिवाय अनेक नेत्यांनी अजित पवार यांच्या गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. या फुटीनंतर शरद पवार यांच्या गटाकडे नगर शहरामध्ये फारशी ताकद राहिली नसल्याचं दिसल्यानंतक अभिषेक कळमकर यांनी आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश केला आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे या देखील उपस्थित होत्या.
नगरमध्ये राष्ट्रवादीला आणखी मजबूत करण्याचा कळमकर यांचा निर्धार
गेले तीन वर्ष ते शिवसेना पक्षात कार्यरत असताना अभिषेक कळमकर यांनी विविध आंदोलनात सहभाग घेत शिवसेनेच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली होती. आता राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने ते अहमदनगर शहरात पक्षाला मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. अहमदनगर शहरात युवा वर्गाचे संघटन अभिषेक कळमकर यांच्या मागे आहे. त्यामुळे त्यांचा शरद पवार गटातील प्रवेश हा महत्त्वाचा समजला जात आहे.
हेही वाचा