(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Politics : शिवसेनेनंतर राष्ट्रवादी अन् लवकरच काँग्रेसचा नंबर, आमदार रोहित पवार यांचा मोठा गौप्यस्फोट
Rohit Pawar : आगामी निवडणुकीच्या आधी काँग्रेस सुद्धा टार्गेट असू शकते, असा गौप्यस्फोट आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
Rohit Pawar : काही दिवसांपूर्वी सांगितलं होत की शिवसेनेनंतर (Shivsena) राष्ट्रवादी टार्गेट आहे, त्यानुसार घर फोडलं, पक्ष फोडला. त्याचबरोबर आगामी निवडणुकीच्या आधी काँग्रेस सुद्धा टार्गेट असू शकते, असा गौप्यस्फोट कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. तसेच अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत गेलेल्या आमदार, पदाधिकाऱ्यांना शरद पवार यांच्या वयाबद्दल बोललेले आवडलेले नाही, त्यामुळे लवकरच परत येतील असा विश्वास देखील रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादीमध्ये (NCP) उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे पहिल्यांदाच कर्जत या आपल्या मतदारसंघात आले आहेत. यावेळी एबीपी माझाशी बोलताना त्यांनी अजित पवार यांच्यासोबत गेलेले अनेक आमदार हे परत फिरतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या मेळाव्यात शरद पवार यांचे वय काढल्याने 30 ते 40 टक्के लोक हे मागे फिरण्याच्या तयारीत आहेत. अशीच काहीशी परिस्थिती ही आमदारांची देखील आहे. पुढच्या 10 ते 15 दिवसात बघा काय परिस्थिती राहते असं रोहित पवार म्हणाले. तसेच पुढच्या निवडणुकीत काँग्रेसचा सुद्धा नंबरसुद्धा लागू शकतो, अशी शक्यता रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.
रोहित पवार म्हणाले की, राज्यातील भाजपवरील (BJP) लोकांचा विश्वास उडालेला आहे. तेव्हा ते गणित बसवण्यासाठी मत विभाजणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पक्ष फोडीचे राजकारण लोकांच्या प्रेमासाठी केलेल नाही, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी केलेल नाही, एका चांगला विचारासाठी केलेला नाही, फक्त सत्तेत येण्यासाठी भाजपने केलेलं आहे. मात्र लोकांना भाजपचा डाव कळून चुकला आहे. महाराष्ट्रातील जनता भाजप पक्षाला नकारात्मक भूमिकेतून बघत आहे. त्यामुळे आधी शिवसेना फोडली, नंतर राष्ट्रवादी पक्ष फोडला, असे राजकारण सुरु आहे. कुठूनतरी आपल्या हातात सत्ता ठेवणे हाच एकमेव उद्देश भाजप पक्षाचा आहे.
भाजपाला धडा शिकवणार
येत्या काळात पक्ष बांधणीसाठी जोमाने काम करावे लागणार आहे. भाजप पक्षाच्या गलिच्छ विचाराशी लढण्यासाठी आम्ही सर्वजण सज्ज असून येत्या काळामध्ये बीजेपीला धडा शिकवायचा आहे, असा निर्धार नेते आणि कार्यकर्त्यांनी केला आहे. अजित पवारांकडून शरद पवार (Sharad Pawar) यांचं वय काढलं गेलं. त्यामुळे त्या बैठकीला असणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी देखील नाराजी व्यक्त केली. त्या बैठकीला अनेक नेते माघारी फिरण्याच्या भूमिकेमध्ये आहे. त्याचबरोबर अजित पवारांबरोबर गेलेल्या आमदारांची तशीच परिस्थिती आहे. जेव्हा निवडणूक लागतील तेव्हा खरी परिस्थिती समोर येईल. या पक्ष फुटीबाबत लोकांमध्ये काय चर्चा आहे, यावरून राजकीय नेत्यांना अंदाज आला असून त्यामुळे पक्षाची बांधणी करत असताना जे आपल्याबरोबर राहिलेले आहेत. त्यांना न्याय देण्याची भूमिका शरद पवार यांची शंभर टक्के राहणार असल्याचे रोहित पवार म्हणाले.